निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
10
  • नोडल अधिकाऱ्यांची आढावा सभा

          गोंदिया, दि.9 : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी जाहीर झालेला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील 65-गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी विविध विषयाचे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणांनी निवडणुकीच्या कामकाजाचे सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

         नविन प्रशासकीय इमारतीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 65-गोंदिया मतदारसंघातील नोडल अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणूक कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पर्वणी पाटील, अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

          जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात घेता सावलीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप लावण्यात यावे. प्रत्येक मतदान केंद्रावर शुध्द पिण्याचे पाणी, विजेची व्यवस्था व स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी व्हील चेअरची व्यवस्था करावी. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी. निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करावा, जेणेकरुन निवडणूक काळात कोणत्याही चुका होणार नाही. प्रशिक्षणाचा फायदा फिल्डवर दिसला पाहिजे. नियमाच्या बाहेर कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घ्यावी. यंत्रणांनी नेमून दिलेली कामे आपले कर्तव्य समजून एकमेकांशी समन्वयाने काम करावे. निवडणूक विषयी गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रियेत सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी व सेक्टर अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन जबाबदारीने कामे करुन निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे शांत वातावरणात यशस्वीरित्या पार पाडावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

          65-गोंदिया मतदारसंघात एकूण 3 लाख 11 हजार 57 मतदार आहेत. यामध्ये स्त्री मतदार 1 लाख 58 हजार 651 असून पुरुष मतदार 1 लाख 52 हजार 397 आहेत. दिव्यांग मतदार 2 हजार 27 आहेत. तृतीयपंथी मतदार 9 आहेत. सदर मतदारसंघात एकूण 362 मतदान केंद्र  आहेत. पोलींग पार्टीला निवडणुकीचे साहित्य नेण्याकरीता शहरी भागात 20 मिनी बसेस व 4 जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागातील पोलींग पार्टीसाठी 26 एसटी बसेस व 6 जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूण झोनल अधिकारी-41, बीएलओ-361, पर्यवेक्षक-36, मतदान पोलींग पार्टी-400, अधिकारी व कर्मचारी-2000 असणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सभेला निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी व सेक्टर अधिकारी उपस्थित होते.