९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदार

0
4

भंडारा दि. ११: चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने  प्रथम गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. यामध्ये 85 वर्षांहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात आली.

मूळ साकोली येथे रहिवासी असणाऱ्या जैनबी जब्बार कुरेशी ह्या 98 वर्षाच्या असून आजारामुळे त्या अंथरुणाला खिळून आहेत. अनेक वर्ष झाले त्यांनी मतदानामध्ये सक्रिय मतदान केले नव्हते. कारण मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांना आधार घेत जावे लागत होते. त्यामुळे अमूल्य मताधिकारापासून त्या वंचित राहत होत्या, मात्र आयोगाने गृह मतदान सुविधा उपलब्ध करून दिल्याने या लोकसभा निवडणुकीसाठी जैनबी जब्बार कुरेशी यांनी मतदान केले.

दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या जैनबी यांच्या कुटुंबांमध्ये त्यांचे पुत्र कलीम जब्बार कुरेशी यांनी गृह मतदान प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच मतदान प्रक्रिया  गोपनीयतेने पार पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये गृह मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पहिल्या दोन दिवसात 1243 मतदारांनी मताधिकार बजावला.

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ 7 एप्रिल रोजी करण्यात आला. जैनबी यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये जैनबी यांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.