आधी पोटोबा, मग… मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत

0
14
मतदान केंद्र बंद ठेवून आत मध्ये जेवणासाठी मतदान अधिकारी व केंद्राध्यक्ष ची पंगत

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्राध्यक्ष, कर्मचाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी मतदान मध्येच थांबविण्याची घटना घडली. या प्रकाराने मतदार केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला.मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान सुरू असताना त्यात कोणत्याही पद्धतीचा खोळंबा होऊ नये, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुठलेही इतर कार्य करता येत नाही. नाश्ता, जेवणसुद्धा मतदान न थांबवता करावे, अशा सूचना आहेत. मात्र हिवरी येथील उच्च प्राथमिक शाळा केंद्रावर खोली क्रं . ४ येथे मतदानासाठी नागरिक रांगेत उभे असताना, मतदान कक्षातील चार अधिकारी, कर्मचारी नाश्ता करण्यासाठी खाली एकत्र बसले. यामुळे दुपारी २ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. जवळपास २० मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती.

याप्रकरणी यवतमाळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश देशमुख यांना विचारणा केली असता, सर्व अधिकारी कर्मचारी एकाच वेळी नाश्ता करत असताना अचानक मतदारांची गर्दी झाली. त्यावेळी होमगार्डने त्यांना काही वेळ थांबण्याच्या सूचना केल्या. नागरिकांची ओरड होताच कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरू केली. या केंद्रावर आता मतदान सुरळीत सुरू आहे, असे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.