भंडाऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाच जणांवर उपचार सुरू

0
14

भंडारा : सध्या जिल्ह्याचे तापमान चांगलेच वाढले आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा प्रचंड वर पोहोचला आहे. लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उन्हाचा त्रास होऊन आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अशातच उष्माघातामुळे लाखांदूर येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाचजणांवर उपचार सुरू आहेत.

भास्कर तरारे (रा. लाखांदूर) यांचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज ३० मे रोजी मृत्यू झाला. रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे यांनी तरारे यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे सांगितले. नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करावा. शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील तापमान नियंत्रित राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन डॉ. टेंभुर्णे यांनी केले आहे.भंडाऱ्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिला आहे. उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडून लागले आहेत. जिल्ह्यात उष्माघातामुळे पहिल्या मृत्युची नोंद झाली असून आणि पाच रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार सुरू आहेत.