गोंदिया: समाजात सकारात्मक बदल घडविण्याकरिता, सेवा रूपाने अनेक महानुभाव व्यक्ती कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या क्षेत्रात कठीण साधनेतून चमत्कारिक कामे करीत असतात. ते प्रसिद्धीच्या झोतात ही नसतात. परंतु अशा लोकांना शोधून काढणे, त्यांच्याद्वारे केलेले कार्य समाजासमोर आणणे व अशा बहुमूल्य रत्नाचा गौरव करणे हे खरोखर दिशा देणारे आहे. यामुळे त्यांना प्रोत्साहन व समाजाला प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ते प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या ९ व्या स्थापना दिनानिमित १ सप्टेंबर रोजी हॉटेल जिंजर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.
प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रामुख्याने जि प अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. राजेंद्र जैन, अदानी पॉवरचे प्रकल्प प्रमुख मयंक दोषी, सचिव रवी आर्य आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आहे. ज्या उद्देशाला घेऊन संस्था कार्य करीत आहे त्यांना आपले नेहमीच सहकार्य असल्याचे ते बोलले. याप्रसंगी आ. चंद्रिकापुरे म्हणाले की वर्तमानपत्र हे समाजाला आरसा दाखविण्याचे काम करते. त्यांनी त्यांचे काम असेच करीत रहावे. या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, पत्रकार हे निष्पक्षपणे घडलेल्या घटना समाजासमोर आणतात. अनेक समस्या शासन व प्रशासनासमोर आणून न्याय मिळवून देण्याचे काम ते करतात. यासोबतच प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया समाजाला आपले काही देणे आहे या भावनेतून जे काम करते ते स्तुत्य असुन सर्व सत्कारमूर्तीना भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जि प अध्यक्ष रहांगडाले म्हणाले की, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना पत्रकारांचे अनेक अनुभव येतात, विविधांगी दर्शन होत असतात. आजकाल तर या क्षेत्रात डिजिटलमुळे मोठी वाढ झालेली आहे. परंतु प्रशिक्षण प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असल्याचे ते बोलले. दोन सत्कारमूर्ती माझ्या जिल्हा परिषदेचे असल्याने मला त्यांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री बडोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज ग्लोबल इंडेक्स मध्ये आपल्या देशाची मिडिया व पत्रकारिता कुठे आहे यावर चिंतन करणे गरजेचे आहे. लोकशाही मध्ये माध्यमांना मोठे महत्व आहे. माध्यमांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडावी कारण जनतेची मोठी अपेक्षा त्यांच्यावर आहे. अदानी पॉवर तिरोडाचे प्रकल्प प्रमुख मयंक दोषी यांनी अपल्या संबोधनातून पूर्वी व आजघडीला देशात होत असलेल्या वीजनिर्मिती बद्दल तुलनात्मक विकासावर विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले पत्रकारांना समाजातील हिऱ्यांना शोधावे लागत असेल तर त्यांनी सुद्धा चिंतन करावे, कारण त्यांचा नजरेतून कुणीही सुटता कामा नये. माध्यम लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहेत, त्यांची जवाबदारी अधिक असल्याचे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अपूर्व मेठी यांनी मागील नऊ वर्षात संस्थेच्या प्रगतीचा आढावा ठेऊन पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या समोरची आव्हाने, त्यांचा संघर्ष व उद्देशावर सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रवि आर्य यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष जयंत शुक्ला यांनी केले. सत्कारमुर्तींचे परिचय वाचन जावेद खान यांनी तर आभार राजन चौबे यांनी मानले.
प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या वतीने वरिष्ठ पत्रकार संतोष पांडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्व.रणजीत भाई जसानी स्मृति जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार नरेश लालवानी यांचा, स्व.रामकिशोर कटकवार स्मृति जिल्हा गौरव कर्त्तव्यनिष्ठ पुरुस्कार श्रीमती अर्चना वानखेड़े यांना प्रदान करण्यात आला, स्व.रामदेव जायसवाल स्मृति गौरव साहित्य रत्न पुरस्कार अॅड.लखनसिंह कटरे यांना सपत्नीक देण्यात आला, स्व.मोहनलाल चांडक स्मृति जिल्हा गौरव कृषिरत्न पुरस्कार उरकुडाभाऊ पारधी यांना, सहयोग संस्थेद्वारा शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा गौरव पुरस्कार नरेन्द्र अमृतकर यांचा सपत्नीक सत्कार, स्व.योगेश नासरे स्मृति जिल्हा विशेष पुरस्कार अशोक मेश्राम व मटका कोला सेवा समिती गोंदिया यांना विशेष पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, गौरवचिन्ह, सन्मानपत्र व पुरस्कार राशी देवून सत्कार करण्यात आले. मटका कोला सेवा समितीतर्फे लक्ष्मीचंद रोचवानी, सतिश रोचवानी, माधवदास खटवानी, सुशिल संतानी, राजकुमार आसवानी यांनी पुरस्कर स्विकारले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष संतोष शर्मा, कोषाध्यक्ष हिदायत शेख, कार्यकारिणी सदस्य हरिन्द्र मेठी, आशीष वर्मा, अंकुश गुंडावार, कपिल केकत, नरेश रहिले, रविन्द्र तुरकर, संजीव बापट, भरत घासले, प्रमोद नागनाथे, मुकेश शर्मा, दीपक जोशी, राहुल जोशी, योगेश राऊत,सौ.अर्चना गिरी, बिरला गणवीर यांनी सहकार्य केले.