जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत जागतिक मधुमेह दिन साजरा  

0
49

गोंदिया,दि.१४ः-विज्ञान युगात मानवाची प्रगती झाली असली तरी विविध शारीरिक व्याधी मात्र वाढल्या आहेत.त्यात मधुमेह आजाराबाबतचे रुग्णही वाढू लागले आहेत.वाढणारे रुग्ण पाहता शासनाच्या वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व आरोग्य संस्थेत मधुमेह संबधाने रक्त शर्करा पातळी बाबत तपासणी निशुल्क केली जात आहे.
मधुमेह ही एक समस्या आहे जी जगभरात झपाट्याने पसरत आहे.भारताबद्दल बोलायचे झाले तर आपला देश मधुमेहाचा सर्वात मोठा बळी ठरत आहे.या आजाराच्या प्रसाराच्या कारणांबद्दल बोलायचे झाले तर, आहार आणि जीवनशैलीतील बदल ही मधुमेहाची सर्वात मोठी कारणे आहेत.मधुमेह हा स्वतःच एक आजार नाही, तर तो इतर अनेक आजारांचा धोका वाढवतो.त्यामुळे सुरुवातीलाच मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी म्हटले आहे.या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले आहे.
दि.14 नोव्हेंबर गुरुवार रोजी के.टी.एस सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी सर्वात प्रथम धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,डॉ.गुरुराज खोब्रागडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,डॉ.पोषण बिसेण,असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी,भौतिक उपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी रुग्णांना मार्गदर्शन करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांनी मधुमेह हा वेदनाविरहित आजार आहे.त्याची लक्षणे रुग्णाला चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत.तहान-भूक अधिक लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, रात्री उठून लघवीस जावे लागणे ही लक्षणे सहसा दुर्लक्षिली जातात.रक्तातील साखर खूप वाढू लागली तर कितीही खाल्ले तरी वजन कमी होण्याचे लक्षणही दिसू शकते.रक्तातील साखर वाढली की हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर ती शरीरभर पसरते आणि शरीरातील प्रथिनांना चिकटते.त्यामुळे विशिष्ट रासायनिक क्रिया होऊन प्रथिनांचे कार्य बिघडते.यात प्रथम रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि हळूहळू गुंतागुंत होत जातात.त्यामुळे मधुमेहपूर्व स्थिती हा एक इशारा असतो. तिथपासूनच काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ.नितीन वानखेडे यांनी या वर्षाची थीम ” ब्रेकिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप्स ” आहे, मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि रोग असलेल्या प्रत्येकाला न्याय्य, कसून, वाजवी किंमतीत आणि उच्च-गुणवत्तेची काळजी मिळण्याची खात्री करण्यासाठी वचनबद्धता हायलाइट करत असल्याचे सांगितले.
डॉ.पोषण बिसेण यांनी वय वर्ष 30 च्या वयोगटातील सर्व लोकांनी नियमित रक्त शर्करा तपासणी करण्याचा सल्ला दिला.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉक्टर स्नेहा वंजारी यांनी NCD कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तपासण्यांची माहिती रुग्णांना दिली.भौतिक उपचार तज्ञ डॉक्टर कांचन भोयर यांनी व्यायामाबाबत मार्गदर्शन केले.तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी रक्तदाब व RBS तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचा लाभ एकूण 22 कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी घेतला.कार्यक्रमासाठी डॉ.ज्योती राठोड,डॉ.अमोल राठोड,सपाटे मॅडम,अर्चना शिवणकर,स्वाती पाटील,उज्वला सेलोकर,मीना रेवतकर,हर्षीला,निधी रहांगडाले,तारकेश उके व विवेकानंद कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.