चंद्रपूर : गडचिरोलीतील नक्षलवाद समुळ समाप्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राम मंदिर निर्माणासोबतच कलम ३७०, तीन तलाक, सीएए लागू केला आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला १५ लाख १० हजार करोड रूपयांसह विकासाचे विविध प्रकल्प दिले आहेत. आता लवकरच वफ कानून बदलण्याची तयारी सुरू आहे. कॉग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे तथा राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा या सर्व गोष्टींना विरोध होता अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्रात महायुती सरकार निवडून देऊन मोदींचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले.
स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्ह्यातील भाजपाच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाहा यांची सभा झाली. यावेळी मंचावर बल्लारपुर मतदार संघाचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोराचे करण देवतळे, राजुराचे देवराव भोंगळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित होते. चंद्रपुरकरांना नमस्कार करित व मी तुमच्या सोबत केवळ पाच मिनिट आहे मला माफ करा असे म्हणत अमित शहा यांनी भाषणाला सुरूवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद व आतंकवाद मुक्त देश करण्याचे काम केले आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मोदी सरकारने नक्षलमुक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये काही प्रमाणात शिल्लक असलेला नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत समाप्त करू अशीही घोषणा शहा यांनी केली. मोदींनी देशाला समृध्द केले आहे. जगात देशाचा सन्मान वाढविला आहे. केंद्रातील मोदी सरकारने १५ लाख १० हजार कोटींसह महाराष्ट्रात विविध प्रकल्प दिले आहेत. याउलट आघाडीने केवळ ३ लाख ९१ हजार करोड विकासनिधी दिला अशीही तुलनात्मक टिका केली. युती सरकारला निवडून दिल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याने घालविलेले वैभव येत्या पाच वर्षांमध्ये परत मिळवून देणार असेही शहा म्हणाले.
शहांच्या पाच मिनिटांच्या भाषणाने सर्वत्र नाराजीचा सूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ४ वाजता सुरू होणारी सभा तब्बल ४५ मिनिटे उशिराने सुरू झाली. त्यामुळे शहा केवळ पाच मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करून परत गेले. शहा चंद्रपुरकरांसाठी मोठी घोषणा करेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. दरम्यान शहा आले आणि निघून गेले त्यामुळे भाषण ऐकण्यासाठी आलेल्यांची घोर निराशा झाली. त्याचा परिणाम सभास्थळी दिसत होता. विशेष म्हणजे, शहा यांनी सभास्थळ सोडताच अवघ्या पाच मिनिटात सर्वजण निघून गेल्याने सभास्थळ व खुर्चा खाली दिसत होत्या. शहा सभेला आले तेव्हाही बहुसंख्य खुर्चा खालीच होत्या. शहांच्या पाच मिनिटांच्या भाषणाने सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आहे.