वामनराव चटप : गडकरी वाड्यावर जाण्यासाठी सज्ज व्हा

0
8

चंद्रपूर : विदर्भ राज्यासाठी शेवटचे आंदोलन १ जानेवारीच्या नंतर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी विदर्भासाठी २-३ ऑक्टोबर रोजी दुसरी प्रतिनिधी सभा भरविण्यात येत आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील वाड्यावर ९ ऑगस्ट रोजी विदर्भ सर्मथक कार्यकर्ते धडकणार आहे. त्याकरिता सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी येथे गुरुवारी केले.
स्थानिक राजाभाऊ खोब्रागडे स्मृती सभागृहात आंदोलन समितीची पूर्वतयारी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अँड. चटप बोलत होते. मंचावर चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, नागपूरचे जिल्हाध्यक्ष अरुण केदार, नंदाताई पराते, सुधाताई पावडे, बाबुराव गेडाम, चंद्रपूर येथील कोअर कमिटी सदस्य प्रा. अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, अशोक मुसळे व अँड. गोविंद भेंडारकर, पूर्व विदर्भ सचिव नितीन भागवत, युवा आघाडी अध्यक्ष अनंत येरणे, कपील इद्दे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अँड. चटप म्हणाले की, तुकाराम महाराजांनी नाठाळांच्या माथी काठी हाणण्याचा आदेश दिला आहे. ती वेळ आता आली आहे. आपण विदर्भ राज्यासाठी १ जानेवारीपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यानंतर जीव जाईपर्यंत विदभ राज्यासाठी आंदोलन करण्यात येईल. ही विदर्भाची लढाई व्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे. युद्ध आणि प्रेमात सर्व क्षम्य असते. लोकशाहीमध्ये आंदोलन करता येते. त्यामुळे आता आपण मागे हटणार नाही. ९ ऑगस्ट रोजी विदर्भातून पाच हजार लोकं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील वाड्यावर जमा होणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातूनही एक हजार लोकं तेथे पोहोचणार आहेत. त्याची तयारी केली पाहिजे.
आज आपण येथे एका जिल्ह्यातील १00 लोकं उपस्थित आहोत. १९३0मध्ये महात्मा गांधी यांनी केलेल्या दांडी यात्रेला देशभरातील ८६ लोकं होते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आपण विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाही. तिसर्‍या पिढीचे लोकं आता चौथ्या पिढीच्या हाती विदर्भ राज्य सोपविणार आहोत. त्याकरिता विदर्भ राज्य आंदोलनाचे तरुणांनी नेतृत्त्व करावे. आमच्या मरणापूर्वी विदर्भ राज्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे.
क्रांती दिनाच्या आंदोलनात आदिवासींचे भुसारी नृत्याचे पथक राहणार आहे. या आंदोलनात सर्वसामान्य लोकं सहभागी नसल्याचे आरोप केले जातात. नागपूर येथे बंजारा समाजाच्या २१ महिला परंपरागत वेशात सहभागी होणार आहेत. गुरूदेव सेवा मंडळ, कामगार संघटनाचे कामगार आदीही सहभागी होणार आहेत. जेष्ठांचा आशीर्वाद घेत तरुणांना पुढे नेऊ, असेही अँड. चटप यांनी सांगितले.