गोंदिया दि.28 : भारतामध्ये 1919 पासुन दर 5 वर्षानी पशुगणना केली जाते. यापूर्वी 2019 ला 20 वी पशुगणना करण्यात आली होती. आता 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर 2024 पासुन ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज झालेली असुन या गणनेत पाळीव प्राणी, कुक्कुट पालन व भटक्या प्राण्यांची वय, लिंग, जात, प्रजाती आणि मालकी हक्क यासंदर्भात माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानुसार प्राण्यांच्या संदर्भाने नियोजन करण्यास मदत होणार आहे. पशुपालन हे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. लाखो कुटूवांना उत्पन्न व पोषण सुरक्षा देणाऱ्या या क्षेत्राचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान आहे. दूध, मांस, अंडी, लोकर इत्यादीच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजिवीकेलाही चालना मिळते. विषेशत: ग्रामीण भागात पशुपालन हा कृषिपुरक व भूमिहीन कुटुंबासाठी स्थिर उत्पादनाचा प्राथमिक स्त्रोत आहे.
सदर पशुगणनेमुळे पशुधन लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक माहिती गोळा करण्या बरोबरच रोग नियंत्रण, जाती सुधारणा, आणि पशुधन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणे पशुधन क्षेत्रातील कल, नमुने व आव्हाने ओळखणे, संसाधनाचे योग्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. 21 वी पशुगणना पशुधन क्षेत्राचा विकास व सुधारणा घडवण्याचे एक महत्वपूर्ण साधन आहे. या माहितीचा वापर शासनाला धोरणे आखण्यासाठी व शेतकऱ्यांच्या क्षेत्राच्या प्रगतीकरिता मदत करण्यासाठी होणार आहे. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडविण्यासाठी शासनाने विविध योजनेच्या माध्यमातुन पशुपालकांना प्रोत्साहन दिले आहे. यात रोग नियंत्रण, जाती सुधारणा, अनुवांशिक सुधारीत पशुधनाचा अवलंबन आणि विमा कवच याचा समावेश आहे. या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाव्दारे शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्यावरही शासनाचा भर आहे.
जिल्हयातील ग्रामिण भागात दर 3000 कुटूंबामागे 1 प्रगणक आणि 5 प्रगणकामागे 1 पर्यवेक्षक तसेच नागरी भागात दर 4000 कुटूंबांमागे 1 प्रगणक आणि 10 प्रगणकांमागे 1 पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाकरीता एकूण 93 प्रगणक व याकरीता 22 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत. तसेच शहरी भागाकरीता एकूण 13 प्रगणक नियुक्त केले असुन याकरीता 2 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहे.
सर्व नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक तसेच विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना 21 व्या पशुगणनेबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यावेळेस 21 व्या पशुगणनेकरीता प्रगणकांना स्वतः चा अॅण्डराईड मोबाईल वापरुन त्यात संपूर्ण माहितीची नोंद करावयाची आहे. याकरीता त्यांना मानधनासोबत मोबाईल वापरण्याकरिता सुध्दा मोबदला दिला जाणार आहे. या वेळेस प्रत्यक्ष पशुधनास कानातील बिल्ला लावुनच त्याची गणना करण्यात येणार आहे.
प्रत्येक गाव/शहरातील प्रगणक आपल्या भागातील नागरिकांशी संवाद साधुन घराघरात जावुन माहिती गोळा करतील. नागरिकांनी या पशुगणनेत सक्रीय सहभाग नोंदवून योग्य माहिती पुरवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.के.तिटमे यांनी केले आहे.