4 डिसेंबरला राबविण्यात येणार जंतनाशक मोहिम
- आमगाव,सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी तालुक्यात राबविण्यात येणार मोहिम
- 1लाख 19 हजार 197 बालकांना देणार जंतनाशक गोळया
- अंगणवाडी व शाळा स्तरावर जंतनाशक गोळी नि:शुल्क खाऊ घातली जाणार
गोंदिया, दि.30 : गोंदिया जिल्ह्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असून याअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी (अलबेंडाझोल 400 mg) दिली जाणार आहे. या उपक्रमाच्या यशस्तीतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी केले.
जिल्हा परिषद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात 4 डिसेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रपरिषदेत माहिती देतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, सहाय्यक जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत खरात, आरोग्य सहाय्यक आर.एन. श्रीवास प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या तालुक्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. सदर तालुक्यातील सर्व शाळांमधून अलबेंडाझोलची गोळी देण्यात येणार असून 1 ते 2 वर्ष वयोगटातील मुलांना अर्धी गोळी पाण्यातून तर 2 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना 1 गोळी चावून खाल्ल्यानंतर पाणी प्यायचे आहे. 4 डिसेंबरला होणाऱ्या या मोहिमेत काही कारणास्तव जे मुले वंचित राहिले त्यांना 10 डिसेंबरला ही गोळी दिली जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी ही गोळी अतिशय आवश्यक असून शिक्षक, पालक यांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार भारतात 1 ते 19 वयोगटातील 68 टक्के बालकांमध्ये कृमी दोष (जंतदोष) आढळुन येतो. तसेच 15 ते 19 वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो.
गोंदिया जिल्हयात 4 डिसेंबर 2024 रोजी ही मोहिम आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या चारही तालुक्यातील 776 अंगणवाडी केंद्र, 664 शाळेमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अंगणवाड्यांमध्ये नोंद असलेल्या बालकांसह शाळांमधील विद्यार्थी व नोंद नसलेले शाळाबाह्य बालके असे एकुण 1 लाख 19 हजार 197 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वय वर्ष 1 ते 19 या वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला मुलींना अंगणवाडी व शाळा स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर ज्या मुलांनी 4 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी खाल्ली नसेल त्यांना 10 डिसेंबर रोजी मॉप अप दिवशी गोळी देण्यात येईल. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग यांचा समावेश आहे. लाभार्थी संख्येनुसार आवश्यक गोळयांचा साठा सर्व केंद्रस्तरावर पोहोचविण्यात येणार असुन सदर मोहिमेची जि.प. प्रसिध्दी विभागाचे प्रशांत खरात यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचे या बाबतीत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.