तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील पोहचले शाळेत

0
63

सडक अर्जुनी- जिल्हयात दि.4 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेतुन आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या चारही तालुक्यातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील बालकांना अल्बेडेंझॉल ही गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.
सदर जंतनाशक मोहीमे दरम्यान सर्व शासकीय शाळा,शासकीय अनुदानित शाळा आश्रमशाळा,नगरपालिका शाळा,खाजगी अनुदानित शाळा,खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कूल,सीबीएससी स्कूल,नवोदय विद्यालय,सुधारगृह,खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे,मिशनरी स्कूल, गुरुकुल संस्कार केंद्रे यांचे सोबत सर्व कनिष्ठ महाविद्यालय,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी,नर्सिंग कॉलेज,आयटीआय,पॉलिटेक्निक, इंजीनियरिंग, कला-वाणिज्य व विज्ञान,फार्मसी महाविद्यालय, डीएड महाविद्यालय तसेच  सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्र ईत्यादी ठिकाणी बालकांना जंतनाशक विरोधी अल्बेडेंझॉल ही गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व नियोजन पुर्ण करुन मोहिमेची व्यापक जनजागृती करण्यात आली.
सदर मोहिमे संबधाने पर्यवेक्षण करण्याच्या दृष्टीकोनातुन सडक अर्जुनीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव जिल्हा परिषद शाळेला भेट देवुन जंतनाशक मोहीमेची पाहणी करुन मुलांशी हितगुज करुन जंतनाशक मोहिमेबाबतचे धडे दिले.तसेच मुलांना प्रत्यक्ष जंतनाशक विरोधी प्रत्यक्ष खावु घातले. त्यावेळेस कार्यक्षेत्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक , आरोग्य सेविका व आशा सेविका यांचे सोबल शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.
डॉ.प्रणित पाटील यांनी या वेळेस कृमी दोष हे रक्तक्षय व कुपोषणाचे कारण असून यामुळे बालकांचे बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटते.मातीतून प्रसारीत होणा-या कृमी दोषाचे प्रमाण २९ टक्के आहे.कृमी दोष असलेली बालके कायम अशक्त व थकलेली असतात.त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नसल्याचे सांगितले.
जंतामुळे बालकाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असुन त्यात रक्तक्षय (अनिमिया),पोटदुखी,उलट्या,अतिसार व मळमळणे,भूक मंदावणे,कुपोषण,थकवा व अस्वस्थपणा, शौचाच्या वेळेस रक्त पडणे,पोटाला सूज येणे असे विविध लक्षणे बालकांमध्ये आढळुन येतात.अल्बेडेंझॉल ही गोळी दर सहा महिन्यातुन एकदा बालकांना दिल्यास रक्तक्षय (अॅनिमिया) कमी होतो, शाळेतील उपस्थिती नियमित होते,बालक क्रियाशील बनते ,त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते,शारीरिक व बौद्धिक वाढ सुधारते व आरोग्य चांगले राहत असल्याचे सांगितले.
जंतांचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी जेवण्याच्या आधी हात स्वच्छ धुवावेत,भाज्या व फळे खाण्यापूर्वी व्यवस्थित धुवाव्यात,स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे,पायात चपला/बूट घालावेत,नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत,शौचालयांचा वापर करावा,उघड्यावर शौचास बसू नये,शौचालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.