सोंड्याटोला प्रकल्पस्थळी राँकासह शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

0
6

तुमसर,दि.17 : बावनथडी नदीवरील महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा थकीत विजेचे देयक असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सिहोरा येथे तुमसर-बपेरा राज्य मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. तर आठवडाभरात वीज पुरवठा सुरू करण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
मागील वर्षभरापासून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. पावसाळा सुरूअसताना नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद आहे. यामुळे चांदपूर जलाशयात केवळ ८ टक्के पाणी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. रास्ता रोको आंदोलन सुरू असताना वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता नंदलाल गडपायले, विदर्भ पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता कुकडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता बॅनर्जी व नायब तहसिलदार शिंदे आले.
सोंड्याटोला प्रकल्पाकडे ३५ लाख ५५ हजार ५३0 रूपये वीज थकबाकी असून पाणीपट्टी कराची वसुली जमा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. सध्या धान पिकाची रोवणी सुरू असताना अशा परिस्थितीत शेतकरी पाणीपट्टी कराची वसुली देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. आठवडा भरात प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरूकरण्याचे आश्‍वासन देण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, उपसरपंच उमेश कटरे, ग्राहक संरक्षक समितीचे तालुकाध्यक्षउमेश तुरकर, बिंदू मोरे, जितेंद्र तुरकर, महेश राहांगडाले, किशोर राहांगडाले, रामलाल पारधी, राजेंद्र बघेले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले, गणेश ठाकूर, सुनिल पटले उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.