देवाटोला ग्रा.प.मध्ये भ्रष्टाचार-देवकी मरई

0
9

देवरी,दि.20 : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या देवाटोला ग्रामपंचायत येथील सोनारटोला येथे मग्रारोहयो अंतर्गत पाईपलाईन पुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप पं.स. सभापती देवकी मरई यांनी केला आहे.
सदर कामात रोजगारसेवक आणि ग्रामपंचायतद्वारे नियमबाह्य बोगस मजुरांची नावे टाकून शासनाचा निधी अफरातफर करण्यात आला आहे. सभापती मरई यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
पंचायत समिती सभापती देवकी मरई यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, २३व २९ जून २0१६ रोजी त्यांनी स्वत: कामाच्या ठिकाणी भेट दिली असता दोन्ही वेळेस रोजगार सेवक उपस्थित नव्हते. रोजगार सेवक नसल्यामुळे मजुरांचे मस्टर, अंदाजपत्रक व भेटपुस्तिका उपलब्ध नव्हते.
या वेळी सभापतीद्वारे मजुरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जे मजूर कामावर येतच नाहीत, अशा बोगस मजुरांची मस्टरवर हजेरी लावण्यात येत असून पैसे घेण्यात येत आहेत.ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत कार्यालयसुद्धा बंद होते. त्यामुळे खरी माहिती सभापतींना मिळाली नाही. त्यांनी कामावरील प्रथम मजुरास सांगितले की रोजगार सेवकांना मस्टर व अंदाजपत्रक घेवून पंचायत समितीला येण्यास सांगा. परंतु अजुनपर्यंत रोजगार सेवक माहिती घेवून पोहोचलेच नाही. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले.
सदर कामात रोजगार सेवक व मग्रारोहयोचे अधिकारी दोषी असल्याचा आरोप पंचायत समितीचे सभापती देवकी मरई यांनी केला आहे.