गडचिरोली : महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांची एकमताने निवड झाली.दि.14 जानेवारीला मुंबई येथे असोसिएशनच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या सभेत अध्यक्षपदी भारती सहकारी बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब कड यांची तर उपाध्यक्षपदी प्रंचित पोरेड्डीवार यांची अविरोध निवड झाली.
महाराष्ट्रातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 335 नागरी सहकारी बँका आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आदी बँका राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या सदस्य आहेत. या असोसिएशनची स्थापना 1939 ला झाली आहे. गेल्या 8 दशकाहून अधिक काळ ही असोसिएशन महाराष्ट्रात सहकारी बँकिंगचा प्रचार आणि संवर्धन करण्यात आघाडीवर आहे. सहकार्य समावेशकता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी असोसिएशन नेहमीच आघाडीवर असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया व नाबार्ड यांच्या वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार सभासद बँकांचे संचालक तथा अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे कार्य करीत आहे.
प्रंचित पोरेड्डीवार यांनी आपल्या निवडीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री पंकज भोयर,नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे तसेच राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या सर्व संचालकांना देत कृतज्ञता व्यक्त केली आहे.