स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान जिल्हा समन्वय समिती सभा संपन्न

0
18
अमरावती, दि. 28- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा कार्यक्षेत्रामध्ये दि. 31 जानेवारी ते दि. 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली.
स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान विशेष मोहीम राबविण्यासाठी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांनी समन्वयाने कार्य करावे. तसेच हे अभियान राबविण्यासाठी अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांनी कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करावी, असे आवाहन श्रीमती संजिता महोपात्र यांनी केले आहे.
स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान विशेष मोहीम राबविण्यासाठी गावनिहाय, वार्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी हे घरोघरी प्रत्यक्ष भेटी देवून सर्वेक्षण करणार आहेत. कुष्ठरोग लक्षणे असणाऱ्या संशयितांची नोंद घेऊन पुढील तपासणी, निदान निश्चिती व त्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी बहुविध औषधोपचार करणार असल्याबाबतची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ.पूनम मोहोकार यांनी दिली.
निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रविण पारिसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जोगी, डॉ. विशाल काळे, तपोवन, कोठारा, निंभोरा येथील अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, नर्सिंग कॉलेज व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच कुष्ठरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.