कोदामेडीच्या सरपंच व सचिवाला निलंबित करा-आयुक्तांकडे तक्रार

0
18

पालकमंत्र्यांच्या नातेवाईक असल्याने कारवाईला उशीर
सडक-अर्जुनी,दि.२६- तालुक्यातील कोदामेडी-केसलवाडा ग्रामपंचायत नेहमीच तालुक्यामध्ये आपल्या अनागोंदी कारभारासाठी चर्चेत असते. अशाच अनियमित कामाला घेऊन कोदामेडी येथील सरपंच अनिता बडोले व सचिव एस.एस. लांजेवार यांची तक्रार कोदामेडीचे ग्रा.प.सदस्य निशांत राऊत व नागरिकांनी थेट नागपूर विभागीय आयुक्तांना पत्र देऊन सरपंच व सचिवाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे सरपंच या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निशांत राऊत यांंंंंनी केला आहे.
सविस्तर असे की, कोदामेडी येथे डिसेंबर २०१५ ला समाजमंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. तसेच दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम जानेवारी २०१६ ला सुरू करण्यात आले. त्यासाठी निविदा रीतसर काम सुरू करण्याच्या अगोदर काढणे अनिवार्य होते, परंतु निविदा फेब्रुवारी २०१६ ला काढण्यात आली होती. ज्या दिवशी निविदा मंजुरीची सभा घेण्यात आली होती,त्याच दिवशी सरपंचाने नोंदवहीमध्ये नोंदविले की, कामांमध्ये हस्तक्षेप नाही व पुढे अजून लिहितात की कामाचे बिल काढा. त्यामुळे निविदा मंजुरीच्या दिवशी बिल काढणे योग्य नाही. तसेच सचिव नोंदवहीमध्ये नोंदवितात की, या दोन्ही कामाची कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये नाही व या कामांचे टेंडरसुद्धा काढण्यात आले नाही. त्यामुळे मी बिल कोणत्या नियमात काढू, असे सुचवितात.
सरपंच व सचिवाच्या अशा धोरणामुळे ग्रामपंचायतचे सदस्य निशांत राऊत, आनंदा झाडे, सुलोचना मुनिश्वर व प्रमिला मरस्कोल्हे यांनी संबंधित कामाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली होती.
त्यानंतर एप्रिल महिन्याच्या मासिक सभेमध्ये दोन्ही कामाचे देयके काढण्याचे विषय विषयसूचीमध्ये घेण्यात आले. त्या महिन्याच्या नोंदवहीमध्येसुध्दा सचिव यांनी नोंदविले की, या कामाचे बिल नियमात बसत नाही व टेंडरसुद्धा काढण्यात आले नव्हते. त्यामुळे बिल देण्यात येत नाही.
परंतु दोन महिन्यांच्या नोंदवहीमध्ये कामाच्या संदर्भात अनभिज्ञता दाखवूनसुद्धा सरपंच अनिता बडोले व सचिव एस.एस. लांजेवार यांनी मे २०१६ मध्ये कामाच्या देयकासंदर्भात विशेष सभा बोलावली. बहुमताच्या आधारे बिल काढण्यास सचिवानेसुद्धा सशर्त पाठिंबा दर्शविला. दोघांनी संगनमताने कोणत्या निकषाने बिल काढले, हे न उलगडणारे कोडे आहे. चार सदस्यांनी सुचविले की चौकशी झाल्यानंतर देयके काढावे, परंतु असे करण्यात आले नाही. त्यामुळे टेंडर न काढताच काम सुरू करणे, निविदेच्या दिवशीच बिलाची मागणी करणे अशा अनेक ठिकाणी सरपंचाने आपल्या पदाचा दुरुपयोग केला. तर सचिव हे पूर्वी कामाची जाणीव नाही व टेंडरसुद्धा नाही असे लिहितात व नंतर बिल कोणत्या नियमात काढतात, हेच कळत नाही.
विशेष म्हणजे कोदामेडी येथील ग्रामसेवक एस.एस. लांजेवार अजूनही कंत्राटी ग्रामसेवक असून ते स्थायी ग्रामसेवक नाहीत. याआधी भ्रष्टाचारामुळे त्या स्थायी झालेल्या नाहीत.त्यामुळे अशा वारंवार भ्रष्टाचार करणाèया कंत्राटी ग्रामसेवकाची जिल्हा परिषदेला गरज काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. अशा ग्रा.पं. संदर्भातील विषयाला घेऊन जिल्हास्तरावर न्याय न मिळाल्याने ग्रा.पं. सदस्य निशांत राऊत व इतर तीन सदस्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना तक्रार देवून कामाची चौकशी करण्यात यावी तसेच सरपंच व सचिव यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.