शेतकरी व नागरिकांच्या समस्यांवर आंदोलन उभारू

0
9

भंडारा,दि.26 : शेतकर्‍यांच्या प्रश्नांसह अन्य ज्वलंत समस्यांची जाणीव व्हावी तसेच त्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी मोठय़ा बाता केल्या. सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांना विसरले. आता संभाजी ब्रिगेड शेतकर्‍यांच्या समस्यांना वाचा फोडणार, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना असून या संघटनेने २५ वर्ष पूर्ण केले आहे. कोकण, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात दौरे करून पूर्व विदर्भातील दौर्‍याचा हा चौथा टप्पा आहे. ‘शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात’ हे संघटनेचे ब्रीद असून त्यादिशेने काम सुरू आहे. निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप नेत्यांनी शेतमालास उत्पादन खर्चासह ५0 टक्के नफा असा हमी भाव देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर ते शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.पीक संरक्षण विमा, कर्जमुक्ती, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण, शेती मालावरील निर्यातबंदी, शिक्षणावर होणारा तुटपुंजा खर्च व गोवंश हत्या कायदा रद्द करणे, धान उत्पादक शेतकर्‍यांचे विविध प्रश्नांवर विचार करून उपाययोजना करावी, यासाठी आंदोलन केले जाईल. गाव तिथे कार्यकर्ता हा उपक्रम राबविला जाईल, शेतकर्‍यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शन केले जाईल, असेही आखरे यांनी सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, जिल्हाध्यक्ष शिशुपाल भूरे, अनिल भुसारी, पंकज धोटे, श्रीकांत बरींगे, चंद्रकांत लांजेवार, सुरेश फुंडे, विश्‍वास बडवाईक, स्वप्नील ठेंगरी, चेतन बोरले, शाम कोसरे, अमित बावणे, केदार नाकाडे, जितेंद्र ढोरे, प्रशांत नेवारे, राजू चामट, संजय बडवाईक, आशिष ठाकरे, सुधीर राऊत, प्रवीण दहीकर, रमण राऊत, दिपक बांते, अजय भेदे, सोनू शेंडे, मनोज मडावी उपस्थित होते.