आरोग्य केंद्रात ओली पार्टी रुग्णवाहिकेची तोडफोड

0
15

गडचिरोली :तालुक्यातील बोदली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची तोडफोड याच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार व इतर तीन कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री केली असल्याचा हा आरोप बोदली येथील नागरिकांनी केला आहे.
२४ जुलैरोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार यांचा वाढदिवस होता. यानिमित्त आरोग्य केंद्राच्या परिरसरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महिला कर्मचारी जेवणानंतर आपापल्या घरी निवासस्थानी व कर्तव्यावर पोहोचल्या. दारू पिल्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, परिचर व्ही. पी. बुरे व वाहनचालक जी. एन. बानबले व आणखी एका कर्मचार्‍याने रुग्णालयासमोरच ठेवलेल्या एमएच-३३-जी-१३५0 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे मागील काच पूर्णपणे तोडले. सदर घटना आपण स्वत: बघितली असल्याचे गावातील नागरिक राजू गावतुरे यांनी चौकशीसाठी आलेल्या जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना सांगितले. सकाळी गावातील युवकांनी डॉ. कन्नमवार यांना उठवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर रुग्णवाहिका आपण फोडली नसल्याचे ते सांगत होते. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.गावातील नागरिकांनी सदर बाब जिल्हा परिषद सदस्य छाया कुंभारे व पं. स. सदस्य अमिता मडावी यांना फोनवरून सांगितली.