विभागीय आयुक्तांनी घेतली हज यात्रा आढावा बैठक

0
9

नागपूर, दि. 26 : ऑगस्ट 2016 पासून नागपूर येथून हज यात्रेला जाणाऱ्या
सर्व हज यात्रेकरुंना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी
करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज विभागीय
आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख, नागपूर
एअर इंडियाच्या स्टेशन मॅनेजर श्रीमती ॲलस पॉल, एअर इंडिया हेड
क्वॉर्टर्सचे मुख्य हज समन्वयक डी. मुरली, नागपूर शहर वाहतूक विभागाच्या
पोलिस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सामान्य प्रशासन उपायुक्त
आप्पासाहेब धुळाज तसेच संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी प्रशासनाला हज यात्रेकरुंना
कोणतीही असुविधा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच
हज यात्रेकरुंना निवास, इमीग्रेशन, विमान प्रवास, दूरध्वनी, आरोग्य
सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

हज हाऊस येथे यात्रेच्या दरम्यान अविरत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात
यावा, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच परिसरात स्वच्छता ठेवणे, अग्निशमन
यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासंबंधी संबंधित विभागाचे अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
तसेच हज हाऊस परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पथ दिवे सुस्थितीत
करणे, या भागातील अतिक्रमित पानठेले, हातगाड्यांवर कारवाई करण्याबाबत
सूचना दिल्यात. त्याशिवाय आरोग्य विभागाचा एक अधिकारी आणि आरोग्य पथकाने
त्यांच्या लसीकरणसाठी शिबिराचे आयोजन करावे. 6 ते 9 ऑक्टोबर हा हज
यात्रेकरुंचा परतीचा प्रवास असून दरम्यानच्या काळात फिरत्या शौचालयांची
सुविधा उपलब्ध करुन द्यावी. बीएसएनएलने पीसीओ बूथची व्यवस्था करावी,
पोलिस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त करावा, हज हाऊस ते विमानतळ या दरम्यान
शहर बससेवा उपलब्ध करुन द्यावी, एअर इंडियाने यात्रेदरम्यान पुरेशा
तिकीट खिडक्या उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच एअरपोर्ट ऑथोरिटीने हज
यात्रेकरुंच्या सामांनाकरिता 50 ट्रॉलीज उपलब्ध करुन द्याव्यात. अशा
सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना
दिल्यात.

हज यात्रा 2016 च्या पूर्व तयारी आढावा बैठकीला पोलिस, बी. एस. एन. एल,
एअर इंडिया, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका, सार्वजनिक
बांधकाम , पाणी पुरवठा , अग्निशमन तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित
होते.