अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयांचं स्वागत केले आहे.सोबतच मध्यमवर्गीय व गोरगरिबांच्या हितासह राष्ट्रनिर्मितीकरीता असलेला अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानतो. बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्यानं ही औषधं स्वस्त होणार आहेत.
देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर झालेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडीट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाख करण्याचा निर्णय देखील स्वागतार्ह आहे. सरकारी शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात येणार आहे.२०२५ बजेट विकसित राष्ट्रासाठीची, महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी असल्याचे माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे.