- जिल्हाधिकारी कार्यालयातमहिला दिन साजरा
गोंदिया, दि.12 : आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपला एक छंद जोपासून समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन भारतीय महसूल सेवेतील (IRS) नागपूर येथील आयकर विभागातील सहसंचालक सृष्टी चौरसीया-नायर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात (ता.8) आयोजित महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, पोलीस निरीक्षक नंदिनी चानपूरकर, स्त्रीरोग तत्र डॉ.गार्गी बहेकार, योग शिक्षिका विद्या दयानी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.राजश्री पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
सृष्टी चौरसीया-नायर म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीने स्वत:चा एक छंद जोपासलाच पाहिजे. छंद कुठलाही असो जसे- गीत गायन करणे, चित्र काढणे, पोहणे, वाचन करणे, खेळणे, बागकाम, विणकाम यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढून स्वत्वाचा विकास होवून समाजात स्वत:ची एक नविन ओळख निर्माण करता येईल. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष समान हक्क निर्माण करायचे असेल तर अशाप्रकारच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात स्त्रीयांबरोबरच पुरुषांचाही सहभाग असणे गरजेचे आहे, ज्यामुळे स्त्रीयांचे अधिकार, स्त्रीयांवर होणारे अत्याचार, स्त्रीयांचे आजार याबाबत पुरुषांनाही ओळख होवून स्त्रीयांबद्दल आदर, सन्मान अधिक प्रमाणात निर्माण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. गार्गी बहेकार यांनी महिलांना होणारे हार्मोनल आजार (PCOD- Polycystic Ovarian Disease) बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. स्त्रीयांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता कमीत कमी 45 मिनिटे व्यायाम करावे, पाणी भरपूर प्यावे, रोज एक तरी फळ खावे, मासिक पाळीमध्ये शरिराची योग्य ती काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
योग शिक्षिका विद्या दयानी म्हणाल्या, स्त्रीयांनी व्यायामासोबतच प्राणायाम नित्यनियमाने कमीत कमी 10 ते 15 मिनिटे तरी ध्यानधारणा व प्राणायाम केल्यास मानसिक आरोग्य संतुलित ठेवता येते असे सांगितले. याशिवाय ‘जो करेल योग.. त्याला होणार नाही कधी रोग’ असे सांगून योगासना विषयीचे महत्व पटवून दिले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘सुहानी की कहानी’ या पथनाट्यद्वारे कार्यालयात स्त्री कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारावर निवारण कसे करता येईल व स्वत:ला सुरक्षीत कसे ठेवता येईल याबाबत सादरीकरण केले व रक्तदान श्रेष्ठदान याविषयी पथनाट्यद्वारे रक्तदानाचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमात कार्यालयीन कामकाज कर्तव्य पार पाडणे, घर सांभाळणे आदींमध्ये सतत व्यस्त असणाऱ्या महिला कर्मचारी यांनी विविध कलागुणांना वाढ देणारे कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी पोलीस शिपाई श्रीमती पाल व स्त्रीरोग तज्ञ डॉ. गार्गी बहेकार यांनी सुंदर गीत गायन सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला पोलीस हवालदार (भरोसा सेल) तनुजा मेश्राम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.