संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचा १८ मार्च रोजी सत्कार

0
223

– देवलगाव प्रथम्, नहरटोला द्वितीय तर गंगाझरी ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार

गोंदिया- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार उद्या १८ मार्च रोजी नवेगावबांध येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्यात करण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दरवर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महारान स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येवून ग्रामपंचायतीना जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येवून उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ऑगस्ट २०२४ मध्य निवड करण्यात आली होती. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे ६ लाखांचे बक्षीस अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव या ग्रामपंचायतीला, द्वितीय क्रमांकाचे ४ लाखांचे बक्षीस तिरोडा तालुक्यातील नहरटोला तर तृतीय क्रमांकाचे ३ लाखाचे पुरस्कार गोंदिया तालुक्यातील गंगाझरी ग्रामपंचायतीला जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर विशेष पुरस्कारासाठी प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीसासाठी तीन ग्रामपंचायतीना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यात स्व. वसंतराव नाईक- सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार सालेकसा तालुक्यातील दर्रेकसा ग्रामपंचायतीला तर स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कार आमगाव तालुक्यातील शिवणी ग्रामपंचायतीला जाहीर करण्यात आला होता. या ग्रामपंचायतीना उद्या १८ मार्च रोजी नवेगावबांध येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्यात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, सर्व विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात येणार आहे.