कोठडीतील आरोपी महिलेवर बळजबरीचा प्रयत्न :फौजदार निलंबित

0
14

पोलीसांत अद्यापह गुन्हा दाखल नाही

गोरेगाव,दि.20- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न 9 आॅगस्टच्या रात्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ठाण्यातील महिला पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रयत्न अयशस्वी झाला. ९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेबाबत पोलीस विभागाने गुप्तता पाळत त्या फौजदारावर गुन्हा दाखल न करता त्याला १६ ऑगस्टला निलंबित केले.ग्यानिराम जिभकाटे (बक्कल नं.९९) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणात यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला सेवेत नियमित करण्यात आले होते.
गोरेगाव तालुक्याच्या जांभळी येथील जंगलात ३१ जुलै रोजी बोंडगावदेवी येथील एका विवाहित युवकाचा खून झाला होता. त्या खुनात इतर दोघांसह आरोपी म्हणून मृत युवकाच्या पत्नीलाही ६ ऑगस्ट २0१६ रोजी अटक झाली होती. त्या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. १0 ऑगस्टपर्यंत ती पोलीस कोठडीत असताना तिच्या सुरक्षेसाठी दोन महिला पोलीस शिपाई मंजुषा घरडे व घनमारे ह्या सेवेत होत्या. सोबतच पोलीस ठाण्यात रात्रपाळीत कर्तव्यावर असलेला सहाय्यक फौजदार ग्यानिराम जिभकाटे हा होता.
आरोपी महिला पोलीस ठाण्याच्या एका खोलीत असताना ९ ऑगस्टच्या रात्री जिभकाटे याने त्या महिलेच्या खोलीचे दार वाजवून तिला उठविले. तुझ्याकडे असलेली मुलगी कुणाची, तिला बापाचा दर्जा मी देईन,यासाठी तू माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर,अशी मागणी त्याने केली. त्यानंतर त्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

सर्वसामान्य लोकांच्या संदर्भात साधी तक्रार आली की चौकशी न करताच अनेक वेळा पोलीस गुन्हा दाखल करतात. परंतु चक्क पोलीस ठाण्यात दोन महिला पोलीस कर्मचारी हजर असताना एखाद्या आरोपी महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. पोलीस विभाग बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करीत नाही किंवा आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा गोरेगावच्या पोलीस स्टेशन परिसरातच सुरु आहे.