26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ धान खरेदी योजनेसाठी ई- पीक पाहणी बंधनकारक

धान खरेदी योजनेसाठी ई- पीक पाहणी बंधनकारक

0
2106

भंडारा,दि.02: हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य व भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा पणन कार्यालय उपअभिकर्ता संस्थामार्फत ही खरेदी केली जाणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रीया ऑनलाईन, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबविण्यात येणार असून त्यासाठी ई- पिक पाहणी अनिवार्य केली आहे.

जिल्ह्यात खरिप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये, यासाठी जिल्ह्यात केंद्र शासनाची किमान आधारभूत किंमत योजना कार्यान्वित आहे. योजनेअंतर्गत जिल्हा पणन कार्यालय आणि आदिवासी विकास विभागाच्या उपअभिकर्ता संस्थामार्फत धानाची खरेदी केली जाते. संपूर्ण खरेदी प्रक्रीया ऑनलाईन पोर्टलद्वारे होणार आहे. फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच खरेदी केंद्रावर बोलावले जाईल. पीक प्रकार, उत्पादन क्षेत्र व खातेदारांची माहिती ही ई- पीक पाहणीवर आधारित आहे. आधार क्रमांक, बँक खाते, तपशिल आदी माहिती ऑनलाईन प्रणालीशी संलग्न केली जाईल.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराने थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल, त्यासाठी ईपीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा पणन कार्यालय, भंडारा तर्फे करण्यात आलेले आहे.

ई- पीक पाहणी आवश्यक का ?

 ई- पिक पाहणी ही शासकीय पोर्टलद्वारे राबविली जाणारी डिजीटल पीक नोंदणी प्रणाली आहे. हे काम शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे “महाभूलेख” किंवा आपले सरकार सेवा केंद्राद्वारे सहज करता येते. त्यांच्याकडे ई- पिक पाहणी नोंद नसेल, अशा शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव केंद्रावर धान्य विकता येणार नाही, तसेच सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन असे जिल्हा पणन अधिकारी,संभाजी बी. चंद्रे यांचे तर्फे करण्यात येत आहे.

blank