भंडारा, दि. 2 :भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत दर सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या जनता दरबारात गटविकास अधिकारी, कृषी, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आदी तालुकास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या, निवेदन हरकती आणि सूचना स्वीकारतील. संबंधित तक्रारी व मागण्या त्या-त्या यंत्रणेकडे पाठवून त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे असेल.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, तहसीलदारांच्या स्तरावर न सुटणारे प्रश्न उपविभागीय अधिकारी आणि आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी स्तरावर मांडले जातील. यामुळे जनतेच्या अडचणींचे त्वरित व प्रभावी निराकरण होण्यास मदत होईल.
आज झालेल्या बैठकीला खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे , उपवनस संरक्षक योगेंद्रसिंह, तुमसर उपविभागीय अधिकारी कश्मीरा संखे, उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रमुख समस्या, तसेच विविध विभागांमधील रिक्त पदांची माहिती घेतली. महसूल प्रशासन हा संपूर्ण व्यवस्थेचा कणा असल्याने तहसीलदारांनी सामान्य नागरिकांच्या छोट्या-छोट्या समस्या सुद्धा गांभीर्याने सोडवाव्यात, असे त्यांनी अधोरेखित केले.
दर आठवड्याला या जनता दरबारातील कार्यवाहीचा अहवाल जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्धी माध्यमांना पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी प्रलंबित बाबी तत्काळ निकाली काढाव्यात, पूर्ण झालेले प्रकल्पांची यादी जिल्हाधिकारी यांना द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या 150 दिवसांच्या लोकाभिमुख कार्यक्रमाअंतर्गत “शून्य प्रलंबित धोरण” काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सप्टेंबर महिन्यात शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यात सामान्य नागरिकांना शासकीय सेवा जलद गतीने पोहोचविण्यावर भर द्यावा, असेही पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.





