बंगल्याच्या नूतनीकरणावर लाखोंची उधळपट्टी

0
10

चंद्रपूर-भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौरांनी खर्चात कपात करून लोकाभिमुख कामे करावी, अशी ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असतानाही चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे कार्यालय, तसेच सभापतींच्या बंगल्याचे नूतनीकरण व रंगरंगोटीवर लाखोची उधळपट्टी केली जात आहे. हा खर्च म्हणजे निव्वळ उधळपट्टी आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
स्थानिक जिल्हा परिषदेत सत्तांतरण झाल्यानंतर भाजपच्या संध्या रूपचंद गुरुनुले अध्यक्ष, तर याच पक्षाच्या कल्पना बोरकर उपाध्यक्ष आहेत. अर्थ व बांधकाम सभापती देवराव भोंगळे, समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, आरोग्य व शिक्षण ईश्वर मेश्राम, तर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सरिता कुडे आहेत. जिल्हा परिषदेच्या या सहाही पदाधिकाऱ्यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच बंगला व कार्यालयाच्या नूतनीकरणावर लाखोच्या खर्चाची उधळपट्टी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांच्या कक्षाच्या नूतनीकरणाला सुरुवात केली. रंगरंगोटी करतांनाच कक्षातच शौचालय, बाथरूम व फर्निचरवर लाखोचा खर्च जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या निधीतून करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता शेटे यांनी दिली.
त्याचप्रमाणे आता सहाही बंगल्यांचे नूतनीकरण व रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. शहरातील गर्भश्रीमंतांचा प्रभाग असलेल्या सिव्हील लाईन वार्डात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापतींचे बंगले आहेत. या बंगल्यांची स्थिती अतिशय उत्तम असताना आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे यांनी गेल्या वर्षीच रंगरंगोटी केलेली असतांनाही आता पुन्हा त्याच बंगल्यांचे नूतनीकरण केले जात आहे.
बंगल्यांमधील टाईल्स काढून तेथे स्पारटेक बसविण्यात येत आहे. तसेच स्वयंपाकाचा ओटा, फर्निचर व इतर साहित्यही बदलले जात आहे. देशाच्या पंतप्रधानांनी खर्चात काटकसर करा, असे निर्देश दिल्यानंतरही भाजपचे लोकप्रतिनिधी अशी उधळपट्टी करीत असतील तर इतरांनी का करू नये, असा प्रश्न आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य करीत आहेत.