23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ ग्रीन दांडिया एव्हरग्रीन महाराष्ट्र गरबा उत्सव : सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा अनोखा...

ग्रीन दांडिया एव्हरग्रीन महाराष्ट्र गरबा उत्सव : सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा अनोखा संगम

0
59

गोंदिया: गोंदिया शहरातील बापट लान, कान्हारटोली येथे सुपर वूमन परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन दांडिया – एव्हरग्रीन महाराष्ट्र २०२५ या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचा २८ सप्टेंबर रोजी उत्साहात समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमाने केवळ नृत्य, संगीत व रोषणाईची रंगत वाढवली नाही तर समाजहिताच्या विविध विषयांवर ठोस संदेश देत गोंदियाच्या सांस्कृतिक जीवनात नवा आदर्श निर्माण केला.
हा उपक्रम २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान पार पडला. दररोज वेगवेगळ्या थीम्सद्वारे समाजहिताचे संदेश देणे हे या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

२४ सप्टेंबरला पारंपरिक गुजराती थीमने उत्सवाला सुरुवात झाली. २५ सप्टेंबरला मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम यावर आधारित सादरीकरण झाले. २६ सप्टेंबरला वृक्षसंवर्धन या विषयावर भर देण्यात आला व नागरिकांकडून वृक्ष लागवडीचा संकल्प करवून घेण्यात आला. २७ सप्टेंबरला राधा-कृष्ण थीमद्वारे भक्ती व प्रेमाचा संदेश देण्यात आला. २८ सप्टेंबरच्या अंतिम दिवशी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.

या महोत्सवात महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रंगीबेरंगी वेशभूषा, संगीताची थाप, रोषणाई आणि झोकदार नृत्य यामुळे पाच दिवस मैदान दुमदुमले. दररोज मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्सवाची रंगत वाढवली.

यावेळी सुपर वूमन संस्थेच्या संचालिका प्राची प्रमोद गुडधे यांनी सांगितले की, “नवरात्र उत्सव हा केवळ आनंद व मनोरंजनापुरता मर्यादित नसून, त्यातून समाजहिताचे संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदा ‘ग्रीन दांडिया’च्या माध्यमातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची हाक देण्यात आली सोबतच मोबाईल चे दुष्परिणाम यावर भर देण्यात आले ”
गरब्यात सहभागी महिलां व मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बेस्ट ड्रेस-अप, बेस्ट परफॉर्मर आणि दांडिया क्वीन ऑफ द डे या स्पर्धांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला.blank
या उपक्रमामुळे पारंपरिक सणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीवही सर्वांना झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुपर वूमन परिवारातील जिल्हा संयोजिका संध्या डोंगरवार, तालुका संयोजिका नेहा पारधी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनीता ठाकूर, मीना टेंभरे, याशिका धामडे,मनीषा महेशगवळी, सुषमा पिल्लारे, नीतू पारासर, हर्षा माईदे,वोपाली वैद्य, स्वाती साखरवाडे, आशा बेले, निधी उपरीकर, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयोजक प्रमोद गुडधे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत म्हटले की, “सण-उत्सवांना केवळ मनोरंजनाचा पैलू न देता, समाजासाठी काहीतरी देणारे स्वरूप द्यावे हीच आमची भूमिका आहे. ग्रीन दांडियाद्वारे हा उपक्रम समाजहिताचा एक छोटासा प्रयत्न आहे.”
‘ग्रीन दांडिया एव्हरग्रीन महाराष्ट्र 2025’ हा दांडिया महोत्सव केवळ सांस्कृतिक रंगतच नव्हे तर पर्यावरणाच्या जपणुकीचा संदेश देणारा ठरला. गोंदियाच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा उत्सव सहभागी व नागरिकांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील.

blank