24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ “स्वस्थ नारी–सशक्त परिवार “अभियानांतर्गत जिल्ह्यात 98924 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

“स्वस्थ नारी–सशक्त परिवार “अभियानांतर्गत जिल्ह्यात 98924 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

0
29

गोंदिया,दि.०१ःकेंद्र शासन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवड्यात ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे.महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब,समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे.या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे राष्ट्रीय अभियान गोंदिया जिल्ह्यात सुद्धा राबविण्यात येत आहे.दि.17 सप्टेंबर पासुन राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान दि.29 सप्टेंबर पर्यंत आरोग्य विभागाच्या जनजागृतीने नागरिकांनी आरोग्य तपासणी मोहिमेला उत्तम प्रतिसाद देत आहेत.दि.29 सप्टेंबर पर्यंत 34718 पुरुष व 64206 महिला असे एकुण 98924 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी प्रजित नायर,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर,उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुरेशजी हर्षे यांचे विशेष आवाहन तसेच जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीरादरम्यान मोठ्या संख्येने गावपातळीवरील महिला आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पुढे येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील या अभियानाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी प्रदीप नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या नेतृत्वाखाली होत असून अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हारअतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे,माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांच्या अधिपत्याखाली केले जात आहे.

 जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय,आरोग्य संस्था या अभियानात सक्रिय सहभाग आहे. जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले आहे.

‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ अभियानात नोडल अधिकारी डॉ.तृप्ती कटरे,डॉ.सुकन्या कांबळे, डॉ.भाग्यश्री गावंडे यांचे सह तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,डॉ.प्रणित पाटील,डॉ.विनोद चव्हाण,डॉ.दर्शना नंदागवळी,डॉ.ललित कुकडे हे गावपातळीवर लक्ष केंन्द्रित करुन आरोग्य शिबीरे नियोजन करित आहे.अभियानाची प्रसिद्धी जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे व आयईसी विभागाचे प्रशांत खरात,सर्व गावपातळी वरिल आरोग्य कर्मचारी,समुदाय आरोग्य अधिकारी व आशा सेविका यांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.

कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना नोकरी व्यवसाय सांभाळणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.स्पर्धा हेच त्यामागील मुख्य कारण मानले जात आहे.फास्ट(जंक)फूड खाण्याची क्रेझव्यायाम नाही,अवेळी व अपुर्ण जेवण,अपुरी झोप,अतिरिक्त कामाचा ताण यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा महिलांना वेळ मिळत नसल्याची वस्तू स्थिती आहे.दुसरीकडे,अजूनही सर्वत्र विशेषतः ग्रामीण भागातील मुली,महिला मासिक पाळी बद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत.समस्या देखील अनेक जण लपवितात.परंतु,तसे करणे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे भान त्यांना करुन देण्याची गरज आहे. गर्भाची वाढ न होणे,तसेच गर्भवतीचे वजन,उंची कमी असल्याने प्रसुतीवेळी अडचणी निर्माण होतात.सृष्टीची निर्माता समजली जाणारी ती सुरक्षित राहावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

     माता सर्वात जास्त दुःख, वेदना सहन करते.कौटुंबिक व नौकरी,शिक्षणाच्या व्यापातून त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.पण या अभियानातून त्यांना तणावमुक्ती व मन: शांतीसाठी योगा,व्यायाम करा,जंकफुड न खाता घरात बनवलेले पोष्टिक जेवण खा,पुरेशी झोप,आराम करा,नियमित तपासणी करणे व फळे खाण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी दिली आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय संस्थांमध्ये वैद्यकीय तपासणी व उपचार मोहिमा राबविण्यात येत आहेत.या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालय व उपकेंद्रे येथे विविध तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून महिलांसाठी आरोग्य तपासणी,एनसीडी स्क्रीनिंग,क्षयरोग तपासणी,अ‍ॅनिमिया व सिकलसेल तपासणी,लसीकरण सेवा,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,आहारविषयक जनजागृती,संसर्गजन्य रोग नियंत्रण,रक्तदान शिबिरे तसेच आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड वितरण या सेवा नागरिकांना उपलब्ध होत आहे.

‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ अभियानात जिल्ह्यातील झालेली कामगिरी

  • कँपची संख्या- 3454
  • तपासणी करण्यात आलेले लाभार्थी- 98924 ( 34718 पुरुष. 64206 महिला)
  • रक्तदाब तपासणी – 56557
  • कर्करोग ( मुख,स्तन व गभार्शय) तपासणी – 76960
  • रक्तक्षय तपासणी – 35680
  • बालकांचे लसीकरण – 7041
  • क्षयरोग – 23478
  • निक्षय मित्र नोंदणी – 948
  • सिकलसेल तपासणी – 14374
  • सिकलसेल कार्ड वाटप – 353
  • आरोग्य कार्यक्रमे व योजना समुपदेशन – 71032
  • आयुष्मान कार्ड नोंदणी -2644
  • रक्तदान केलेले लाभार्थी- 228

अभियानाचा उद्देश-

  • ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी सर्वांगीण आरोग्य तपासणी करणे आणि         

           जनजागृती घडून आणणे आहे

  • आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये दररोज तपासणी व जनजागृती शिबिरे.
  • ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय महिला रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ञ तपासणी शिबिरे
  • आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्राथमिक तपासणी स्क्रीनिंग शिबिरे.

  उपलब्ध सेवा

  • महिला आरोग्य तपासणी उच्च रक्तदाब,मधुमेह,तोंड/स्तन/गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग तपासणी,किशोरवयीन मुली व महिलांसाठी रक्तक्षय तपासणी व समुपदेशन आदिवासी भागात सिकलसेल तपासणी.
  • माता व बाल आरोग्य सेवा गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी,पोषणाविषयी मार्गदर्शन बालकांची लसीकरण.
  • आयुष सेवा,आयुर्वेद,होमिओपॅथी,युनानी,सिद्ध,नॅचरोपॅथी आदी उपचार पद्धती.
  • जनजागृती व वर्तन बदल संवाद, मासिक पाळी स्वच्छता,पोषण,निरोगी जीवनशैली बाबत मार्गदर्शन.
  • रक्तदान शिबिरे एक ऑक्टोबर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त विशेष शिबिरे.
  • नोंदणी व कार्ड वाटप आयुष्यमान भारत डिजिटल मिशन,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड व सिकलसेल कार्ड वाटप.
  • निक्षय मित्र नोंदणी क्षय रुग्णांना पोषण सहाय्य मिळावे यासाठी स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींना जोडणे.