गोंदिया : खरीप हंगामातील पिकांची स्थिती व उत्पादनाची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला काढली जाते. जिल्ह्यातील ९९५ गावांपैकी ९१९ गावांतील शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड केली जाते. तर पिकांची लागवड न केलेल्यांमध्ये ३६ गावांचा समावेश आहे. गावांतील ९१९ पिकांची नजरअंदाज पैसेवारी ही ५० पैशांच्या वर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीकस्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. तर अंतिम पैसेवारी ही ३० डिसेंबरला प्रशासनाकडून जाहीर केली जाते.
पैसेवारीच्या स्थितीवरुन सरासरी किती उत्पादन होणार याचा अंदाज बांधला जातो.शासनाकडून सोयीसवलती दिल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पैसेवारीला फार महत्त्व आहे. पैसेवारीच्या स्थितीवरून यावर्षी पीकस्थिती कशी आहे, तसेच सरासरी किती उत्पादन होणार याचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असते. जिल्ह्यात खरिपात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहे. तर मध्यम आणि जड स्वरूपाचे धान निघण्यास जवळपास महिना दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. एवढा पाऊस धान पिकासाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात पीकस्थिती ही समाधानकारक असल्याचे महसूल विभागाने जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीवरून दिसून येते.
गोरेगाव तालुक्याची नजरअंदाज पैसेवारी सर्वाधिक
जिल्ह्यात ९५५ महसूल गावे असून, त्यातील ३६ गावांत पीक घेतले जात नाही. खरीप हंगामाखाली २ लाख २ हजार ८४९.१८ हेक्टर जमिनीपैकी १ लाख २६ हजार ३६५ हेक्टर क्षेत्राखाली धानाची लागवड करण्यात आली.जिल्हा प्रशासनाकडून नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात गोरेगाव तालुक्यातील २४ गावांत १ रुपये ०८ पैसे नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली,ती सर्वाधिक आहे.
तालुका जाहीर केलेल्या ५० पैशांवर
गावांची संख्या पैसेवारी असलेली गावे
गोंदिया १५३ १५३
गोरेगाव ९४ ९४
तिरोडा १२३ १२३
अर्जुनी मोरगाव १४८ १४८
देवरी १२८ १२८
आमगाव ८३ ८३
सालेकसा ८६ ८६
सडक अर्जुनी १०४ १०४
एकूण ९१९ ९१९





