
गोंदिया : बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवसाचे प्रमाणपत्र सादर करणे व त्यातील अटी-शर्तीची पुर्तता करणे कामगारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. परिणामी कामगारांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा कटकारस्थान यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. या अन्यायाला घेवून ग्रामविकास ग्रामीण रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने २७जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी सुरेंद्र गेडाम यांनी दिली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या अटी-शर्तीची पुर्तता करणे कामगारांकरिता डोकेदुखी ठरली आहे. अलीकडे या योजनेच्या लाभापासून यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी कामगारांना वंचित ठेवत असल्याचा प्रकारही पहावयास यंत्रणा मिळत आहे. ९० दिवसाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. मात्र ते प्रमाणपत्र सादर कुठून करावे, असा प्रश्नही कामगारांपुढे निर्माण होत आहे. स्वयंघोषणा पत्रानुसार कामगार असल्याचा पुरावा देत असतांनाही तानाशाही प्रमाणे वाघणारी कामगारांच्या अर्जाना नामंजुर करीत आहेत. विनाकारण त्रुट्या काढल्या जातात. त्याबाबतची माहिती देखील त्या कामगारांना दिली जात नाही. एकंदरीत योजनांच्या माध्यमातून कामगारांची चेष्टा केली जाते आहे, असा आरोपी रोजंदारी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. आम्ही कामगार आहोत, आमचे काय कसूर असा
सवालही कामगारांकडून उपस्थित केला जात आहे. या अन्यायाला घेवून कामगार संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान कामगारांची नवीन नोंदणी व नुतनीकरण तसेच बेकायदेशीर पद्धतीने नाकारलेले अर्ज मंजुर करण्यात यावे, लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करावी, तीन महिन्यापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असलेल्या अर्जाचे नुतनीकरण करण्यात यावे, तालुका सेतू केंद्र बंद करावे, शिष्यवृत्तीचा लाभ तीन महिन्यात देण्यात यावा अशा आदी मागण्यांचे निवेदनही देण्यात येणार असल्याची माहिती सुरेंद्र गेडाम यांनी दिली आहे.




