28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ संत चळवळ म्हणजेच जातीविरोधी सामाजिक क्रांती-राष्ट्रीय चर्चासत्रात सखोल वैचारिक मंथन

संत चळवळ म्हणजेच जातीविरोधी सामाजिक क्रांती-राष्ट्रीय चर्चासत्रात सखोल वैचारिक मंथन

0
34
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागाच्या वतीने आयोजित “महाराष्ट्रातील संतांचे जातिनिर्मूलनात योगदान” या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र वैचारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि विचारप्रवर्तक ठरले. या सर्व सत्रांतून संत परंपरा ही केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून, ती जातीविरोधी, विवेकाधिष्ठित आणि सामाजिक परिवर्तनाची मूलभूत चळवळ असल्याचे ठामपणे अधोरेखित झाले.
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र रक्षक यांनी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समानतेचे तात्विक अधिष्ठान” तर डॉ. राजेंद्र वाटाने (तायवाडे विद्यालय, कोराडी) यांनी “समाजक्रांतिकारक गाडगेबाबा” या विषयावर चिकित्सक व्याख्यान झाले.
दुसऱ्या सत्रात डॉ. विमल थोरात (प्राध्यापक, हिंदी विभाग, इग्नू) यांनी चोखामेळ्यांच्या क्रांतिकारी विचारांचा सखोल बौद्धिक वेध घेतला. चोखामेळा हे केवळ भक्त संत नसून, तत्कालीन जातीव्यवस्थेला थेट आव्हान देणारे परखड विचारवंत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. संत चळवळ ही बौद्ध चळवळीचेच पुढील सामाजिक-सांस्कृतिक रूप असल्याचा ठाम विचार मांडत, चोखामेळ्यांच्या अभंगांमधील वेदना या वैयक्तिक नसून समाजव्यवस्थेवरील तीव्र वैचारिक टीका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याच सत्रात डॉ. शैलेंद्र लेंडे (मराठी विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी स्त्री संतांच्या क्रांतिकारी परंपरेचा सखोल वेध घेतला. स्त्री संतांनी मांडलेली समता, आत्मसन्मान, विवेक आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये ही आधुनिक स्त्रीवादाची पूर्वपीठिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “संत स्त्रिया ह्याच खऱ्या अर्थाने आधुनिक स्त्रिया आहेत,” हा निष्कर्ष मांडत त्यांनी स्त्री संतांच्या अभंगांमधील निर्भीड सामाजिक भूमिका आणि वैचारिक खोली अधोरेखित केली. ‘वज्रसूची’ ग्रंथाच्या संदर्भातून जातीविरोधी वैचारिक परंपरेची सलगता त्यांनी स्पष्ट केली.
तिसऱ्या सत्रात डॉ. सतीश बडवे यांनी “संत नामदेव आणि सामाजिक सुधारणेतील साहित्यिक योगदान” या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. संत नामदेव हे केवळ भक्त कवी नसून, समता, नैतिकता आणि मानवी मूल्यांवर आधारित सामाजिक चळवळीचे साहित्यिक शिल्पकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर डॉ. भगवान फाळके यांनी भक्ती चळवळ ही जातीविरोधी संघर्षाचा पहिला टप्पा असल्याचा मूलगामी विचार मांडला. लोकभाषांना प्रतिष्ठा देणे, वारी परंपरेचे सामाजिक महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संत साहित्यावरील चिकित्सक दृष्टिकोन त्यांनी सविस्तरपणे अधोरेखित केला.
चौथ्या सत्रात डॉ. प्रमोद मूनगाटे यांनी संत चळवळीचा व्यापक, तौलनिक आणि ऐतिहासिक वेध घेत तिला धर्माच्या चौकटीपलीकडील सामाजिक क्रांती म्हणून मांडले. अलवार संत, बसवेश्वर, लिंगायत चळवळ यांचा संदर्भ देत त्यांनी संत चळवळ ही रूढी, कर्मकांड आणि धर्मसत्तेला थेट आव्हान देणारी असल्याचे स्पष्ट केले. ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिविरोधी चळवळीला दिलेले ठोस वैचारिक अधिष्ठान आणि संत परंपरेशी असलेली त्याची सलगता त्यांनी अधोरेखित केली. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विचारवंत असल्याचे मत मांडत, संत चळवळीची आजच्या काळातील प्रासंगिकता त्यांनी स्पष्ट केली.
अध्यक्षीय व समारोपीय भाषणात विभाग प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी समकालीन सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वास्तवावर परखड भाष्य केले. बुद्धाचा धम्म, संत साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे मानवकेंद्री व विवेकाधिष्ठित समाजनिर्मितीच्या एकाच वैचारिक परंपरेचे भाग असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. वाढती हिंसा, कट्टरता आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर संत साहित्याची गरज अधिक तीव्र झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या चर्चासत्राला एम.ए. चे विद्यार्थी, संशोधन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या श्रोता वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.