देवरी,दि.0१: खरीप धानाची शासकीय हंगामातील शेतकऱ्यांकडून योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात आली. त्याला जवळपास तीन महिने होत आहेत. पण अद्यापही धानाचे चुकारे आणि बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन धानाचे चुकारे आणि बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अन्यथा या विरोधात आंदोलनाचा इशारा माजी आमदार तथा शिवसेना(शिंदे गट)पक्षाचे नेते सहषराम कोरोटे यांनी शुक्रवार (दि.३० जानेवारी)रोजी प्रसिध्दी पत्रका द्वारे शासनाला दिला आहे.
प्रसिध्दी पत्रकात सहषराम कोरोटे यांनी म्हटले आहे की, गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या खरीप हंगामातील धान खरेदीला शासनाकडून निधी न मिळाल्याने १ लाख शेतकऱ्यांचे ७५० कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी केला जातो.
यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर १ लाख ३० हजार ८९२, तर आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर २९ हजार ५२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला आतापर्यंत तीनदा धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले. मात्र, तीन महिन्यांच्या कालावधीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. विशेष म्हणजे गेल्या आठ दहा वर्षात प्रथमच तीन महिने चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध न झाल्याचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांना धानाची लागवड करणे, कापणी, मळणी व उन्हाळी धान लावणे, मका लागवड करणे तसेच रब्बी पिकांची लागवड करण्याकरिता येणाऱ्या खर्चाकरिता पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आणि बोनस त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या क्षेत्राचे माजी आमदार तथा शिवसेना (शिंदे गट)पक्षाचे नेते सषराम कोरोटे यांनी शासनाला प्रसिध्दी पत्रका द्वारे दिला आहे.





