देवरी -तालुक्यातील मुरदोली ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम जरताळटोला येथील दि. १२ मार्च २०२६ रोज गुरुवारला रात्री १०:३० वाजे दरम्यान एका घराला आग लागल्याने संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे. तसेच आगीत घरातील साहित्य देखील जळाल्याने संसाराची राखरांगोळी झाली आहे. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे.
जरताळटोला येथील विनोद सखाराम खांडवाई यांच्या घराला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने घरात राहणाऱ्या अकरा सदस्यीय खांडवाये यांच्या कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आगीत संपूर्ण घर आणि घरातील अन्नधान्य, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून राख झाल्याने खांडवाये कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.





