गोंदिया : जिल्ह्यातील वनक्षेत्रात सध्या मोहफुल संकलनाचा हंगाम सुरू झाला असून देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत जेठभावडा अंतर्गत मौजा मसूरभावडा येथे अस्वलाच्या हल्ल्यात १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. आयुष रवी शहारे (वय १६, रा. मसूरभावडा, ता. देवरी, जि. गोंदिया) असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर सध्या गोंदिया येथील केटीएस शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या मोहफुल संकलनाचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक सकाळच्या वेळेत जंगल परिसरात जाऊन मोहफुल संकलन करत असतात. त्याच अनुषंगाने मसूरभावडा गावातील रहिवासी रवी शहारे हे आपल्या मुलगा आयुषसोबत शनिवारी सकाळी मोहफुल वेचण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते.दरम्यान, आयुष मोहफुल वेचत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक मागून त्याच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आयुष घाबरून गेला आणि त्याला सावरायच्या आतच अस्वलाने त्याला खाली पाडत कमरेखालील भागावर तीन ठिकाणी चावा घेतला. मुलाच्या किंकाळ्या ऐकून जवळच असलेले त्याचे वडील रवी शहारे तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मोठ्या धैर्याने हातातील काठीच्या सहाय्याने अस्वलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले आणि आयुषला त्याच्या तावडीतून सोडवण्यात यश आले.हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या आयुषला तात्काळ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला गोंदिया येथील केटीएस शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोंदिया रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे





