32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता रेती माफियांचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला

रेती माफियांचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला

0
172
file photo

blank

तिरोडा : तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचा भस्मासुर आता इतका फोफावला आहे की, थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजेच पत्रकारांवर हल्ले होऊ लागले आहेत. अवैध रेती माफियांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे पत्रकार अजय विश्वनाथ नंदागवळी यांच्यावर ३० मार्च रोजी – मुंडीपार मार्गावर भरदिवसा प्राणघातक 5 हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण तिरोडा तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय नंदागवळी हे आपल्या दुचाकीने जात असताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीला जोरात कट मारून खाली पाडले. त्यानंतर त्यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. ‘रेती चोरीच्या बातम्या का लावतोस? आता जर बातम्या लावल्या तर घरी येऊन मारू,’ अशी उघड धमकी देत आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने हल्ल्याचा थेट संबंध अवैध रेती उत्खननाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकारावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला आघात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कलमे लावून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जोर
धरत आहे. जर प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना आणि अवैध रेती माफियांना पाठीशी घातले, तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिरोड्यात माफियाराज उघड?
तिरोडा तालुक्यातील मांडवी, पांजरा, मुंडीपार या भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रीच्या अंधारात यंत्रांच्या सहाय्याने रेती उपसली जात आहे. तर दिवसाढवळ्या टिप्परमधून तिची अवैध वाहतूक सुरू आहे. या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊन आणि तक्रारी देऊनही महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाच्या याच’ मौनसंमती’ मुळे रेती माफियांचे मनोबल वाढले असून, ते आता पत्रकारांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्यात माफियाराज चाललयं काय? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

blank