25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

0
67
• ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य
बुलढाणा दि. 2 : सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील सुपुत्र व भारतीय लष्कराच्या ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालियनचे हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आज त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी दालनात आयोजित सत्कार समारंभात जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, हवालदार संतोष मोरे यांनी आपल्या शौर्याने जिल्ह्याचे नाव उंचावले असून त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचे धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
हवालदार संतोष मोरे हे गेल्या १२ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत असून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा (तंगधार) भागात सेवा बजावत असताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मे २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने हे ऑपरेशन राबवले होते.
९ मे २०२५ रोजी रात्री पाकिस्तानकडून झालेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात श्री. मोरे यांच्या उजव्या हाताला छर्रे लागून ते जखमी झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा सुरू ठेवत कर्तव्य बजावले. त्यांच्या या अद्वितीय धैर्याची दखल घेत केंद्र शासनाने १५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना ‘शौर्य पदक’ जाहीर केले होते. या पदकाचे वितरण २८ मार्च २०२६ रोजी उधमपूर येथील सेना उत्तरी कमांड मुख्यालयात आयोजित एका विशेष समारंभात पदक प्रदान करण्यात आले.