28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ वीर बालक तन्मयची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करा

वीर बालक तन्मयची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करा

0
68

* कोहळी समाज विकास मंडळाचे निवेदन

साकोली -तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या पंधरवड्यात बाम्पेवाडा, उमरझरी व आमगाव बुज या तीन ठिकाणी नरभक्षी वाघाने तिघांवर हल्ला करून दोघांचा बळी घेतला असून नुकत्याच आमगाव बुज येथील वाघाच्या हल्ल्यातील गंभीर जखमी महिला छाया सुधाकर मुंगमोडे वय ४३ नागपूर येथील खाजगी दवाखाण्यात उपचार घेत आहे. या घटनेतील महिलेचा शूर मुलगा तन्मयच्या समयसुचकतेमुळे व शौर्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे जखमी महिलेला भरीव आर्थिक मदत मिळावी व तन्मय सुधाकर मुंगमोडे या वीर बालकाची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करावी अशा आशयाचे निवेदन कोहळी समाज विकास मंडळाच्या वतीने दि.२ एप्रिल २०२६ रोजी देण्यात आले.

छाया सुधाकर मुंगमोडे ही आमगाव बुज येथील महिला आपला मुलगा तन्मय सुधाकर मुंगमोडे यांचे सोबत जंगलालगतच्या शेतावर कामाकरिता गेली असता वाघाने अचानक हल्ला करून महिलेला ओढत नेले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्षणभर तन्मय विचलीत झाला परंतु त्याने लगेच स्वत: ला सावरले व जखमी आईला वाचवण्याकरिता धावून मोठ्या धाडसाने वाघासोबत झटापट करून आपल्या आईला वाघाच्या तावडीतून सोडविले. त्याची आई छायाबाई या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तन्मयने लगेच तिला मोटारसायकलवर बसवून गावात आणले. त्यानंतर तिला सर्वप्रथम साकोली उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असून ती एका खाजगी दवाखाण्यात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

या अकल्पित घटनेत तन्मयने दाखविलेले धाडस, शौर्य, बुद्धीचातुर्य, प्रसंगावधान व मातेसाठी जीवाची बाजी लावून केलेली वाघाशी झटापट या सर्व गोष्टी असाधारण आहेत. त्यामुळे या प्रकारच्या घटना पुन्हा होवू नयेत म्हणून वनविभागाने या नरभक्षी वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा. उपचार घेत असलेल्या महिलेला भरीव आर्थिक मदत द्यावी व विशेष म्हणजे तन्मयने दाखविलेल्या शौर्याबद्दल त्याची शौर्य पुरस्कारासाठी शासनाकडे शिफारस करावी अशा आशयाचे निवेदन कोहली समाज विकास मंडळाचे वतीने आज उपविभागीय अधिकारी साकोली व सहाय्यक वनसंरक्षक सुरेश मेंढे साकोली यांना सादर करण्यात आले.यावेळी कोहली समाजाचे विदर्भाचे उपाध्यक्ष अमोल मुंगमोडे, गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरवार, भंडारा जिल्हाध्यक्ष मनिष कापगते, उपाध्यक्ष रवि परशुरामकर, सचिव बाळकृष्ण लंजे, नगरसेविका प्रीती डोंगरवार व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.