23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ कचऱ्याच्या आगीमुळे ३३ केव्हीच्या चार केबल जळून खाक; वाठोडा परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत

कचऱ्याच्या आगीमुळे ३३ केव्हीच्या चार केबल जळून खाक; वाठोडा परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत

0
32
*नागपूर:* प्रजापती चौक, नाग नदी पुलाजवळ साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे ३३ केव्ही क्षमतेच्या चार मुख्य इनकमर केबल्स जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज (दि. ५ एप्रिल २०२६) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे ३३/११ केव्ही वाठोडा उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जळालेल्या केबल्समध्ये ‘पार्डी १’ आणि ‘पार्डी २’ या वाहिन्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या पथकाने तातडीने धाव घेत, वाठोडा उपकेंद्रावरील भार (लोड) ३३ केव्ही मोबिलिटी फीडरवर वळविला, ज्यामुळे परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सध्या ‘पार्डी १/वाठोडा १’ या जळालेल्या केबल्स बदलण्याचे काम मे. आरा इलेक्ट्रिकल्स या एजन्सीमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.
*वीज सुरक्षेबाबत महावितरणचे महत्त्वाचे आवाहन*
केवळ बाहेरील नव्हे, तर घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा वायरिंग जुनी झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घरी किंवा परिसरात आग लागल्यास घाबरून न जाता, सर्वप्रथम मुख्य वीजपुरवठा (मेन स्विच) बंद करावा. पाणी वापरणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे शक्य असल्यास कार्बन डायऑक्साइड अग्निशमन यंत्र किंवा कोरडी रेती वापरून आग विझवण्याचा प्रयत्न करावा आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करावे.
नॅशनल इलेक्ट्रिक कोडनुसार, घरगुती वायरिंगचे आयुष्य साधारणतः २० ते २५ वर्षे असते. त्यामुळे ज्यांच्या घराचे वायरिंग २० वर्षांपेक्षा जुने झाले आहे, अशा ग्राहकांनी महाराष्ट्र शासनाचे परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून आपल्या वायरिंगची तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक असल्यास वायरिंग बदलून घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
blank