28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा : १५ एप्रिलपासून आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा : १५ एप्रिलपासून आंदोलन

0
149

अर्जुनी मोरगाव- तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘अन्नदाता’ धान उत्पादक शेतकरी संघ आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध १४ मागण्यांसाठी १६ मार्च रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने धानाचे खरेदी उद्दिष्ट वाढवून खरीप हंगामातील उर्वरित धान खरेदी करावी, ३१ मार्चपूर्वी धानाचे चुकारे द्यावेत, मका खरेदी केंद्र सुरू करावीत आणि धानाला बोनस जाहीर करावा, अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याशिवाय, ३१ मार्चपर्यंत कर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांना थकबाकीदार नधरता सवलत द्यावी, शेतीसाठी १६ तास वीज पुरवठा करावा, भावांतर योजना सुरू करावी आणि सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणीही ललित बाळबुद्धे यांनी केली आहे. स्थानिक समस्यांमध्ये अर्जुनी मोर ते माहूरकुडा रस्त्याची दुरुस्ती आणि सुजल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत होणारी पाणी दर वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर या मागण्यांचे निराकरण झाले नाही, तर १५ एप्रिल २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. त्यानंतरही तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण, रस्ता रोको, तहसील कार्यालयाला घेराव आणि रेल्वे रोको आंदोलनाचा पवित्रा ‘अन्नदाता’ शेतकरी संघाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे ललित बाळबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.