अर्जुनी-मोर.-धाबेटेकडी/आदर्श परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत प्रज्वल गोवर्धन मेश्राम या अवघ्या सहा वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व शोकाचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी प्रज्वलच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचे तसेच शासकीय मदतीच्या सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, परिसरात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने कारवाई करून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदारांनी दिल्या.या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, आर.एफ.ओ. भुवरे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, नाजूक कुंभरे, नूतन सोनवाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, सरपंच घणिता नाकाडे, नितीन नाकाडे तसेच इतर जनप्रतिनिधी, वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत गंभीर चिंता व्यक्त होत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.





