चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यात ३० मार्च २०२६ रोजी घडलेली पत्रकारावर हल्ल्याची घटना ही केवळ गुन्हेगारी कृत्य नसून महसूल व पोलीस प्रशासनाच्या ढिलाईचे ज्वलंत उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अवैध वाळू तस्करीविरोधात सातत्याने तक्रारी व बातम्या समोर येत असतानाही संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरल्यानेच अशा घटना घडत असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र पत्रकार संघ, तिरोडा यांनी केला आहे.
सकाळचे वार्ताहर अजय विश्वनाथ नंदागवळी (रा. पांजरा, ता. तिरोडा, जि. गोंदिया) यांच्यावर मुंडीपार परिसरात अवैध वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे, या भागात दीर्घकाळापासून अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असूनही महसूल व पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांकडून वारंवार तक्रारी करूनही कारवाईचा केवळ दिखावा करण्यात आला. परिणामी, तस्करांचे मनोबल वाढले असून त्यांनी आता थेट पत्रकारांवर हल्ले करण्यापर्यंत मजल मारली आहे. रात्रीच्या वेळी खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, तर शासनाच्या महसुलालाही कोट्यवधींचा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पत्रकार संघ, तिरोडा यांनी जिल्हाधिकारी, गोंदिया यांना निवेदन सादर करत महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ अंतर्गत संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना अटक व तडीपार करण्यात यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोषींवर त्वरित कारवाई करून अवैध वाळू तस्करीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.





