अर्जुनी मोरगाव -तालुक्यातील चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या आर्थिक अडचणींबाबत आज इंद्रनील नाईक, पालकमंत्री, गोंदिया यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात अर्जुनी मोरगाव, रामपुरी, खांबी व सिरेगाव येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १८ वर्षांपासून ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करत असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, वाढता खर्च व अपुरी महसूल वसुली यामुळे या योजना सध्या मोठ्या आर्थिक तुटीत चालू असून, देखभाल व दुरुस्ती कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
यावर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना, विशेषतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांना, सकारात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या योजनांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, किशोर तरोणे तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते.
दरम्यान, या सकारात्मक प्रतिसादामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





