27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ वाढत्या उन्हात बाहेर जाण्यास टाळावे : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

वाढत्या उन्हात बाहेर जाण्यास टाळावे : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

0
53

गोंदिया, दि.21 : जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून, सद्या जिल्ह्यात 41 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेपासून उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज उष्मालाट पुर्वतयारी बाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी श्री. गोंदावले बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय अवधाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्री. गोंदावले म्हणाले, जिल्ह्यात सध्या तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसात ते अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या परिणामाबाबत प्रत्येक विभागाने दक्ष राहून काम करावे. उष्माघात होऊन मृत्यू होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याचे नागरिकांनी आपल्या घरी ग्रीन मॅटचा वापर करावा, जेणेकरुन उष्णतेचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
श्री. गोंदावले पुढे म्हणाले, प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात यावे. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास विलंब न करता जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासंबंधित जनजागृतीपर पॉम्पलेट्स लावावेत. उष्माघाताच्या रुगणांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय वार्डाची व्यवस्था करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर स्थानिक रुग्णालयांमध्ये ओ.आर.एस. (ORS) पावडरसह आवश्यक वैद्यकीय सुविधा यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. लहान मुले, दिव्यांग व्यक्ती, स्त्रिया, वृध्द लोक आणि मजूर यांसारख्या असुरक्षित गटांसाठी विशेष काळजी घेण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
साधारणत: प्रत्येक शासकीय कार्यालयात जनतेला भेट देण्यासाठी दुपारी 2 ते 4 ही वेळ देण्यात येते. परंतु सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांना भेटण्याची वेळ ही सकाळी 10 ते 11 किंवा सायंकाळी 5 ते 6 अशी वेळ देण्यात यावी. तसेच शाळा-महाविद्यालयाची वेळ सुध्दा सकाळी ठेवण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
असे करा : दुपारी 12 ते 3 दरम्यान बाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे. उन्हात जातांना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा. लिंबूपाणी किंवा ताक प्यावे. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. हलक्या वजनाचे व फिकट रंगाचे सैलदार कपडे वापरावे. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावे. पाळीव पण्यांना सावलीत व थंड ठिकाणी ठेवावे. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे.
असे करु नका : शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे उन्हात करुन नये. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नये. गडद रंगाचे व तंग कपडे वापरु नये. उन्हाच्या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे. स्वयंपक घर हवेशीर ठेवावे. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे. खुप प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नये. अशी माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली.