मनपा अग्निशमन सभापती रुपाली ठाकूर यांची अकस्मात पाहणी
नागपूर : मनपा अग्निशमन समितीच्या सभापती सौ. रुपाली परशू ठाकूर यांनी नेहरू नगर झोन अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची अकस्मात पाहणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाईचे निर्देश दिले. दिघोरी परिसरातील नंदनवार हॉस्पिटलची पाहणी केली असता संबंधित रुग्णालयाने अग्निशमन विभागाची आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतले नसल्याचे आढळून आले. यापूर्वीही नोटीस देऊन कारवाई करण्यात आली असतानाही रुग्णालय प्रशासनाने नियमांचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयावर महाराष्ट्र अग्निशमन अधिनियमातील कलम ६ तसेच कलम ८(१) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सभापती ठाकूर यांनी दिले. तसेच अशा सर्व रुग्णालयांची पुन्हा तपासणी करून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान मुख्य अग्निशमन अधिकारी (CFO) तुषार बाराहाते, समितीचे उपसभापती नगरसेवक लखन येरावार, सक्करदरा अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी शिर्के तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, नागपूर शहरात अग्निशमन नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या रुग्णालये, हॉटेल्स, ट्युशन क्लासेस व इमारतींवर लवकरच व्यापक नोटीस व कारवाई मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.





