28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ मका खरेदीस उशीर; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

मका खरेदीस उशीर; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

0
42

अर्जुनी-मोर.- तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका खरेदी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. २०२५-२६ हंगामातील मका खरेदी सुरू करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, बाराभाटी आदिवासी सेवा सहकारी संस्थेमार्फत मका खरेदी सुरू होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत आदिवासी विकास महामंडळ उप प्रादेशिक कार्यालय तसेच संबंधित विभागांकडे निवेदन देण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही स्पष्ट सूचना किंवा निर्णय जाहीर झालेला नाही. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रियाही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
यंदा मका उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, बाजारभावात सतत चढ-उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना योग्य दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी कर्ज घेऊन शेती केली असून, मका विक्री लांबल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संबंधित संस्थेकडे तातडीने मका खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांच्या आत खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किशोर बेलखोडे, शंकर धानगाये,किशोर येरणे व परिसरातील शेतकरीवर्गातून होत आहे.