26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ महिलांच्या आत्मनिर्भरतेतूनच गावासोबत कुटुंबाचा विकास शक्य – उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड

महिलांच्या आत्मनिर्भरतेतूनच गावासोबत कुटुंबाचा विकास शक्य – उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड

0
110

ककोडीत ‘सुपर वुमन ग्राम कनेक्ट’ अभियानाचा शुभारंभ; स्व-गणना मोहिमेचाही जागर

ककोडी/गोंदिया:“एका सक्षम स्त्रीमुळे संपूर्ण कुटुंब सावरले जाते आणि जेव्हा कुटुंबाची प्रगती होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावाचा आणि देशाचा विकास होतो. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या आरोग्यासोबतच शिक्षण आणि कौशल्याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘सुपर वुमन ग्राम कनेक्ट’ हे अभियान ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर करण्याची एक सुवर्णसंधी असून, यातूनच महिलांच्या प्रगतीची नवी गाथा लिहिली जाईल,” असे प्रतिपादन देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी केले.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ककोडी येथील शासकीय आश्रमशाळेत ‘सुपर वुमन ग्राम कनेक्ट’ अभियानाचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमगावचे तहसीलदार तथा स्व-गणना मोहिमेचे नोडल अधिकारी नवनाथ काठवडे, ककोडीच्या सरपंच मीनाताई मडावी, उचेपूरच्या सरपंच सेवंताबाई गहाणे, मेहताखेडा येथील सरपंच कृष्णा सरपा, शासकीय आश्रमशाळेचे प्राचार्य श्री. मोटघरे, अधीक्षक श्रीमती पशीने, ‘सुपर वुमन’चे संचालक प्रमोद गुडधे आणि संचालिका प्राची गुडधे व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात कविता गायकवाड यांनी ‘सुपर वुमन’ अभियानाच्या चतु:सूत्रीवर विशेष भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की: महिला अनेकदा कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, महिला निरोगी राहिली तरच कुटुंब निरोगी राहील.
शिक्षण हे बदलाचे सर्वात मोठे साधन आहे. महिलांनी स्वतः शिकून आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित करावे.ग्रामीण भागात बचत गटांचे जाळे विस्तारलेले आहे. महिलांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना ओळखून स्थानिक संसाधनांच्या आधारे छोटे उद्योग उभारावेत, यासाठी ही संस्था तांत्रिक पाठबळ देणार आहे.विदर्भाच्या इतर भागांच्या तुलनेत गोंदिया-देवरी परिसरात निसर्गसंपदा उत्तम आहे. “आपल्याकडे निसर्गाचे वरदान आहे, पण भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी आणि उत्तम निसर्ग जतन करण्यासाठी आतापासूनच वृक्षारोपण व पाणी बचतीचे नियोजन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

स्व-गणना मोहिमेत ‘सुपर वुमन’ची भूमिका निर्णायक: तहसीलदार नवनाथ काठवडे
२०२६ च्या जनगणनेसाठी शासनाने प्रथमच ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) ही डिजिटल प्रक्रिया अमलात आणली असून, या मोहिमेला तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सुपर वुमन’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमगावचे तहसीलदार तथा स्व-गणना मोहिमेचे नोडल अधिकारी मा. श्री. नवनाथ काठवडे यांनी केले.​
ग्राम कनेक्ट उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी विशेषतः महिलांच्या सहभागावर भर दिला. ते म्हणाले की, “घराघरात तंत्रज्ञान पोहोचवण्यात महिलांचा वाटा मोठा असतो. सुपर वुमनने जर या मोहिमेची जबाबदारी स्वीकारली, तर आमगाव तालुक्यातील एकही कुटुंब या डिजिटल प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक सुपर वुमनने आपल्या परिसरातील किमान १० कुटुंबांना स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित करावे.”

कार्यक्रमादरम्यान ग्रामीण महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये मीनाक्षी शहारे, मिथला गुरभेलिया, चमेली शनीचरा, कंचन लाडे, रविता राउत, मधु चौहान आणि सुनीता शहारे यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत पारितोषिके पटकावली. तसेच, ककोडी येथील प्रसिद्ध समाजसेवक महेंद्र मोहबंशी यांचा त्यांच्या पत्नीसह सत्कार करण्यात आला, जे सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुपर वुमनचे संचालक प्रमोद गुडधे यांनी केले. त्यांनी ‘सुपर वुमन ग्राम कनेक्ट’ अभियानाचा मुख्य हेतू सांगताना, ही संस्था कशा प्रकारे गावागावांत पोहोचून महिलांना सक्षम करणार आहे, याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन तालुका संयोजिका पिंकी कटकवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचालिका प्राची गुडधे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारुल मोहबंशी, कंचन लाडे, मधु चौहान, उषा मोहबंशी, तामेश्वरी चौहान, संध्या कासिम, उर्वशी गौतम, रितू नान्दनकर, उर्मिला घरसिया, चांदनी शनीचरा, सविता घाटघुमर, शिल्पा बडोले, रविता राउत, सुनीता शहारे, राणी भटगुलास, नंदनी भटगुलास, सुनीता उकनकर, पुष्पा वरकडे, रीना नान्दनकर, रोशनी नान्दनकर आणि रागिनी नान्दनकर यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला ककोडी परिसरातील ‘उमेद’ ग्राम संघाच्या बचत गटांच्या महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सुपर वुमन संस्था स्वतःहून आपल्या गावापर्यंत आली आहे, ही आपल्यासाठी विकासाची मोठी संधी आहे,” अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या या शेवटच्या टोकावर सुरू झालेली ही सक्षमीकरणाची लाट संपूर्ण जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त झाला.

blank