गोंदिया:’माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज ११ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, दवनीवाडा येथे एच.पी.व्ही. (HPV) लसीकरण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सत्रात धापेवाडा उपकेंद्रातील एकूण ९ किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी एच.पी.व्ही. लस टोचण्यात आली.
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी किशोरवयीन मुलींचे लसीकरण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
वैद्यकीय पथकाचा सहभाग:
हे लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी दवनीवाडा आरोग्य केंद्राचे डॉ. अख्तर आणि द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. शहारे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच धापेवाडा दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.लसीकरण प्रक्रियेत आरोग्य सहायिका (LHV) हेमने सिस्टर, देसकर सिस्टर, रहांगडाले सिस्टर आणि तुलसी ठाकरे सिस्टर यांनी तांत्रिक जबाबदारी सांभाळून लाभार्थ्यांचे समुपदेशन केले.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर:
‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेद्वारे गावागावात आरोग्याप्रति जागृती केली जात आहे. भविष्यात होणाऱ्या जीवघेण्या आजारांपासून मुलींचे संरक्षण व्हावे, यासाठी पालकांनी आपल्या ९ ते १४ वयोगटातील मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. आजच्या यशस्वी सत्राबद्दल आरोग्य वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.





