सडक अर्जुनी : खरीप हंगाम तोंडावर असताना एकीकडे विविध रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उत्पादन खर्चाच्या आधारावर दुप्पट भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप होत आहे.
सन २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान Narendra Modi यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर दुप्पट भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही धानाच्या हमीभावात अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
दरम्यान, खतांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेतीचा खर्च आणखी वाढला आहे. प्राप्त माहितीनुसार, 20:20:0:13 या खताच्या दरात तब्बल ३०० रुपयांची वाढ झाली असून इतर प्रमुख खतांच्या दरातही १२५ ते २२५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.





