25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ नाशिक येथे बोली अभ्यासक कार्यशाळेत झाडीपट्टी दंडारीचे सादरीकरण

नाशिक येथे बोली अभ्यासक कार्यशाळेत झाडीपट्टी दंडारीचे सादरीकरण

0
39

साकोली,दि.१८ः नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘बोली अभ्यासक कार्यशाळे’त पूर्व विदर्भाच्या झाडीपट्टी संस्कृतीचा अनोखा आविष्कार अनुभवायला मिळाला. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी येथील गुरुदेव सांस्कृतिक, क्रीडा व दंडार मंडळाने सादर केलेल्या पारंपरिक ‘दंडारी’ने उपस्थित रसिक, अभ्यासक आणि मान्यवरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसीय कार्यशाळेत झाडी बोलीचा गंध, लोकसंस्कृतीचे वैभव आणि लोककलेची अस्सल परंपरा यांचे दर्शन घडले.
जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक बोलीभाषा, लोककला आणि सांस्कृतिक परंपरा अस्तित्वाच्या संघर्षात उभ्या आहेत. अशा काळात झाडीपट्टीतील ग्रामीण कलाकारांनी आपल्या मातीतल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी घेतलेले प्रयत्न विशेष आशादायी ठरत आहेत. प्रमाणभाषेच्या भक्कम पायाभरणीत बोलीभाषांचा मोठा वाटा असतो, ही जाणीव या कार्यशाळेतून प्रकर्षाने अधोरेखित झाली.
सुमारे चौदाशे वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली ‘दंडार’ ही केवळ मनोरंजनप्रधान लोककला नसून झाडीपट्टीच्या सामूहिक जीवनपद्धतीचे, सामाजिक सलोख्याचे आणि लोकभावविश्वाचे सजीव प्रतीक मानली जाते. लोकजीवनातील सुख-दुःख, श्रमसंस्कृती, निसर्गनिष्ठा, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांचे दर्शन या कलेतून घडते. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संकल्पनेतून नव्या रूपात साकारलेली ही दंडारी कार्यशाळेतील विद्वान, साहित्यिक आणि अभ्यासकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात झाडीच्या गौरवगीताने झाली. त्यानंतर गण, गौळण, लावणी यांसारख्या पारंपरिक सादरीकरणांसोबत वृक्षारोपण, शिक्षण, देशसेवा आणि सामाजिक जागृती यांसारखे समाजप्रबोधनपर विषय प्रभावीपणे मांडण्यात आले. शाहीर यशवंत कापगते यांच्या दमदार गायनाने कार्यक्रमात रंगत निर्माण केली, तर ढोलक मास्तर सुधाकर झोडे यांच्या तालबद्ध ठेक्यांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. नवोदित शाहीर भास्कर कापगते यांनी आपल्या सहज आणि ओघवत्या शैलीत लोकभावनांना स्वर दिले.
नकलाकार बळीराम चाचेरे आणि हेमराज कापगते यांच्या विनोदी व उपरोधिक सादरीकरणाने उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडविले. मुकेश कापगते, हितेश कापगते आणि प्रमोद कापगते यांनीही आपल्या उत्स्फूर्त सहभागातून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. तसेच रुपेश कापगते, भूषण कापगते, चंदन हटवादे, मोहित कापगते, राजेश कापगते, दीपक कापगते, चोपराम हटवादे आणि भास्करभाऊ कापगते या कलाकारांनी दंडारीच्या सादरीकरणात उल्लेखनीय योगदान देत लोककलेची परंपरा किती सशक्त आणि जिवंत आहे, हे प्रभावीपणे दाखवून दिले. त्यांच्या सादरीकरणात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता; उलट मातीतल्या सुगंधाने नटलेली अस्सल झाडी संस्कृती प्रत्येक ठेक्यातून अनुभवायला मिळत होती.
कार्यशाळेला भाषा संचालक अरुण गीते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, बोलीभाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. शरद मेश्राम, झाडीपट्टी कवी प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी झाडी बोली आणि दंडार या लोकपरंपरेच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या कलाकारांचे विशेष कौतुक केले. डॉ. लक्ष्मीकांत कापगते यांनी झाडीपट्टी दंडारीचा इतिहास आणि वर्तमान याविषयी माहितीपूर्ण विवेचन करून उपस्थितांना या लोककलेच्या वैभवाची ओळख करून दिली. नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत घुमलेली ही झाडीपट्टी दंडारी केवळ कलासादरीकरण नव्हते, तर ती पूर्व विदर्भाच्या लोकअस्मितेची आणि सांस्कृतिक समृद्धीची प्रभावी घोषणा ठरली.

blank