गोंदिया : शहरातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या असलेल्या अंडरग्राउंड मार्गाची दैनावस्था झाली आहे. दररोजी होणारी वाहतूकीची कोंडी तसेच अपघात हे नित्याचेच झाले असून १७ मे रोजी या मार्गाच्या दुरावस्थेला घेवून रस्त्यावर जनतेचा संताप उसळला. दरम्यान रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान, आंदोलकांनी नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करीत १५ ऑगस्टपूर्वी रस्ता बांधकाम सुरू झाले नाही तर भविष्यात आणखी तिव्र आंदोलन केले जाईल, त्यासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल. तसेच या मागणीला घेवून नगराध्यक्ष सचिन शेंडे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले.
सविस्तर अशे की, या मार्गाच्या दैनावस्थेला घेवून सन २०२३ मध्ये तीन दिवसाचे उपोषण करण्यात आले होते त्याची दखल घेत नगर परिषदेने ५ कोटी ६७ लाखाचा रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावामुळे शहरातील नागरिकांना लवकरच या नरकयातने सारख्या परिस्थितीतून सुटका होईल, अशी आस होती, मात्र, तीन वर्षे उलटूनही जमिनीवर अजूनही कोणतीही प्रगती झालेली नाही तसेच प्रस्तावाचे केवळ एक आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप शहरवासी करू लागले आहेत. अंडरग्राउंड रस्त्याची अवस्था तशीच असल्याने दररोज हजारो नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनचालकांचे अपघात होत आहेत. माहितीसाठी वारंवार लेखी आणि तोंडी विनंती करूनही प्रशासनाने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने, नागरिकांनी आज रस्ता अडवला.आंदोलना दरम्यान, प्रशासनाला घटनास्थळीच इशारा देण्यात आला की, हे आंदोलन केवळ प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी करण्यात आले. जर १५ ऑगस्ट पूर्वी रस्त्याचे बांधकाम सुरू झाले नाही, तर शहरातील जनता तीव्र आंदोलन करणार, अशी भूमिका आंदोनकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान या रास्तारोको आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष, गोंदिया जिल्हा तक्रार निवारण समिती आणि भूमिगत संघर्ष समितीकडून पाठिंबा मिळाला. काही दिवसापुर्वीच नगरसेवक लोकेश (कल्लु) यादव यांनी नाल्यांची स्वच्छता केली. त्यासाठीही प्रशासना ऐवजी त्यांनाच पुढाकार घ्यावा लागला. मात्र त्या रस्त्याची अवस्था बघून काल झालेल्या आंदोलनाचा उद्रेक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम नगर परिषद प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला.
पावसाळ्यात वाहतुकीचे तीनतेरा
रेल्वेमुळे शहर दोन विभागात वाटला आहे. जुना उड्डाणपूल तोडल्यानंतर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक अंडरग्राउंड मार्गाने होत असते. मात्र पावसाळ्यात साचणारा पाणी या मुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहन धारकांना जीव मुठीत घेवून किंवा इतरत्र मार्गाने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात हा प्रकार असला तरी अन्य दिवसातही नालीचा पाणी रस्त्यावर साचत असल्याने त्याचाही त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती स्थानिक नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास असतांनाही यावर ठोस उपाययोजना झाली नसल्याने किमान आंदोलनाची दखल घेवून १५ ऑगस्ट रोजी रस्त्याची समस्या मार्गी लागेल, अशी आस शहरवासीयांना लागली आहे





